जळगावात लग्नपत्रिका वाटप करुन येणाऱ्या पित्याचा रस्ता अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:33 PM2018-12-02T12:33:17+5:302018-12-02T12:33:34+5:30
दुचाकीला धडक
जळगाव : मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटप करुन घरी परत येत असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने गंभीर जखमी झालेले डिगंबर तुकाराम पाटील (वय ५९, रा.म्हाडा कॉलनी, दूध फेडरेशनजवळ, जळगाव, मुळ रा.कडगाव, ता. जळगाव) या पित्याचा शनिवारी सकाळी उपचार सुरु असताना मृत्यू झाला. शिरसोली रस्त्यावर रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ शुक्रवारी सायंकाळी हा अपघात झाला.
डिगंबर पाटील यांची मुलगी प्रिया हिचा विवाह भुसावळ येथील युवकाशी निश्चित झाला आहे. १७ डिसेंबर रोजी तिचा जळगाव येथे विवाह सोहळा होणार आहे. त्यासाठी पाटील हे स्वत:च दुचाकीने फिरुन नातेवाईकांना पत्रिकेचे वाटप करीत होते. शुक्रवारी त्यांनी पाचोरा व म्हसावद या भागात पत्रिकांचे वाटप केल्या. सायंकाळी घरी परत येत असताना साडे सहा वाजता रायसोनी अभियांत्रिकीजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात ते दुचाकीसह रस्त्याच्याकडेला फेकले गेले. लोकांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले. नंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर मार लागला असल्याने शनिवारी सकाळी १० वाजता त्यांचा मृत्यू झाला.
लग्नपत्रिकेवरुन पटली ओळख
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता दुचाकीत लग्नपत्रिका दिसून आल्या. लग्नपत्रिकेवर असलेल्या मोबाईलवर संपर्क साधला असता जखमी हे डिंगबर पाटील असल्याची ओळख पटली. पाटील यांना दोन मुली व एक मुलगा आहे. लहान मुलगी प्रिया हिचा विवाह निश्चित झाला आहे. १७ डिसेंबरला तिचा विवाह आहे. मुलगा शुभम बांभोरीजवळील एका कंपनीत नोकरीला असून तो अविवाहित आहे. शनिवारी दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या निधनाबद्दल कडगावसह म्हाडा कॉलनीतील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.