मुलाच्या मृत्यूनंतर महिनाभरात पित्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:18 AM2021-02-09T04:18:21+5:302021-02-09T04:18:21+5:30
जळगाव : मुलाने आत्महत्या करून जीवनाला कवटाळल्यानंतर अवघ्या महिनाभराच्या आत पित्याचाही संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी शहरापासून काही अंतरावर ...
जळगाव : मुलाने आत्महत्या करून जीवनाला कवटाळल्यानंतर अवघ्या महिनाभराच्या आत पित्याचाही संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी शहरापासून काही अंतरावर असलेल्या शामा फायर या फटाके निर्मितीच्या कारखान्यात घडली. पंडित सुकलाल बारी (सुन्ने) (६०, रा. शिरसोली प्र.न.) असे मृत झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित बारी हे शिरसोली रस्त्यावर असलेल्या श्यामा फायर कंपनीत २२ वर्षांपासून कामाला होते. सोमवारी सकाळी कंपनीत गुरांसाठी लागवड केलेल्या गवतात ते पाणी भरण्याचे काम करीत होते. कंपनीतील सहकारी शिवदास भगवान खलसे व पंडित बारी दोघे जण ११.४५ वाजता सोबत होते. त्यानंतर शिवदास निघून गेले. जेवण झाल्यानंतर पुन्हा दुपारी १ वाजता पंडित बारी यांना भेटायला आले असता ते गवतात मृतावस्थेत आढळून आलेले. त्यांनी हा प्रकार तातडीने मालक प्रकाश श्यामलाल मिलवानी यांना सांगितला. मिलवानी यांनी जवळ जाऊन पाहणी केल्यानंतर पोलीस पाटील श्रीकृष्ण पाटील यांना फोन करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्याचे सांगितले. रुग्णवाहिका न मिळाल्याने कंपनीच्या वाहनातूनच मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मालक आल्याशिवाय शवविच्छेदनास नकार
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंडित बारी यांचा मुलगा गणेश, लक्ष्मण, ग्रा.पं. सदस्य श्रावण ताडे, माजी सरपंच रामकृष्ण काटोले व नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे हवालदार शिवदास चौधरी व स्वप्निल पाटील यांनी पंचनामा करून पूर्तता केली, परंतु मृत्यूचे कारण स्पष्ट न झाल्याने मालकाने त्याचा खुलासा करावा व कुटुंबीयाला मदत करावी, त्याशिवाय मृतदेहाचे शवविच्छेदन करू न देण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.
सलगच्या घटनांनी कुटुंबावर आघात
पंडित बारी यांचा मुलगा शिवाजी याने १२ जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. या घटनेला एक महिनाही पूर्ण होत नाही, तोच पित्याचा मृत्यू झाला. सलगच्या या घटनांमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. पंडित बारी यांच्या पश्चात पत्नी सखुबाई, मुलगा गणेश, लक्ष्मण, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
कामाच्या पहिल्याच दिवशी मृत्यू
लॉकडाऊनमुळे कंपनी बंद होती. त्यामुळे काम बंद होते. दिवाळीच्या काळात कंपनी सुरू झाली होती, तेव्हा पंडित बारी कामावर आले, मात्र पुन्हा रोजगाराचा फटका बसला. त्यामुळे ते दिवाळीपासून घरीच होते. सोमवारी कामावर येण्याचा त्यांचा पहिलाच दिवस होता. कामाच्या पहिल्याच दिवशी मृत्यू झाल्याने कामगारांमध्ये हळहळ व्यक्त केली जात होती.