अपघातातील जखमी पिता-पूत्राचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:28 PM2019-01-22T22:28:04+5:302019-01-22T22:28:29+5:30
जखमी पत्नीची प्रकृती गंभीर
पारोळा : कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी झालेल्या पिता पुत्राचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात तालुक्यातील दळवेल येथे महामार्गावर पेट्रोलपंपासमोर २० रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झाला होता. या अपघातातील जखमी पत्नीची प्रकृती गंभीर आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील कुंडाणे येथील रहिवासी येथील जावेद जहांगीर पिंजारी (३५) व अंजूम जावेद पिंजारी (३०) हे दाम्पत्य मुलगा अयान जावेद पिंजारी (११) याच्यासह बात्सर तालुका भडगाव येथे दोंडाईचा येथील नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. लग्न आटोपून परताना त्यांच्या दुचाकीला (एम. एच., १९-ए.व्ही.८१७५) कारने (एम.एच.१९, सी.व्ही. ०४७४) धडक दिली. या अपघातात जावेद पिंजारी व अयान पिंजारी हे जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान धुळे येथे मृत्यू झाला तर अंजूम पिंजारी या गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कार उलटून कारमधील दोन महिला, चालक व मुलगीदेखील जखमी झाले. मात्र ते कार सोडून जळगावकडे निघून गेल्याचे सांगण्यात आले. याबाबत तबरेज जाकिर पिंजारी रा. दोंडाईचा यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय सुधाकर लहारे हे करीत आहेत.