रेल्वेतून पडल्याने केरळच्या तरुणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:05 PM2019-05-28T12:05:32+5:302019-05-28T12:06:02+5:30
स्थानिक केरळी बांधवांनी केली मदत
जळगाव : चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्यानंतर रायपूर येथील नोकरी सोडून राजकोट येथे रेल्वेने जात असताना सूर्या सनिस कृष्णनकृती (वय २७ रा. नांगीयार कुरणंलरा पो. पेल्लीमनुर ता. पोट्टलयम जि. आलपी,केरळ ) या विवाहित तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास पाळधी गावाजवळ घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनिस कृष्णनकृती (वय ३) आणि त्यांची पत्नी सूर्या हे दोघे छत्तीसगड राज्यातील रायपूर येथेआयुर्वेदिक दुकानावर काम करत होते.गुजरात राज्यातील राजकोट येथे जास्त पगाराची नोकरीची संधी चालून आली. यासाठी दोघांनी रायपूर येथे आपल्या कामाचा राजीनामा दिला. नव्या कामाच्या ठिकाणी हजर होण्यासाठी पती-पत्नी रेल्वेने राजकोट येथे रेल्वेने जात असतांना पाळधी -बांभोरी गावाजवळ दरवाजाजवळ सूर्या उभी असतांना तोल जाऊन खाली पडली.
पत्नी खाली पडल्याचे लक्षात आल्यानंतर सनीसने तत्काळ साखळी ओढून रेल्वे थांबवली. झालेला प्रकार रेल्वे कर्मचाऱ्यांना सांगितला. यानंतर पाळधी येथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगावात राहणारे केरळ राज्यातील नागरिकांनी कोणताही विलंब न करता जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन मदतकार्य केले. नातेवाईक आल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला जाणार आहे.