जळगाव येथे आॅईल कंपनीत पत्र्याच्या छतावरुन पडून मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:52 PM2018-06-28T12:52:46+5:302018-06-28T13:01:19+5:30
मदत मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा
जळगाव : आॅईल कंपनीत पत्र्याच्या छतावर डांबर लावण्याचे काम करताना पडल्याने रमेश मुलचंद चव्हाण (वय ३८, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव, मुळ रा.आंबेवडगाव, ता.पाचोरा) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता एमआयडीसीतील श्री विनायक आॅईल इंडस्ट्रीज या कंपनीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रोहीत अग्रवाल यांच्या मालकीची एमआयडीसीत एन.५२ सेक्टरमध्ये कंपनी आहे. तेथे पत्र्याच्या शेडवर रमेश चव्हाण हे काम डांबर लावण्याचे करीत होते. त्यावेळी पत्रा फाटल्याने चव्हाण हे ४५ फूट अंतरावरुन थेट खाली पडले. जखमी झालेल्या चव्हाण यांना मालक वअन्य मजुरांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
नातेवाईकांचा मालकावर आरोप
रमेश यांचा मृत्यू मालकाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. पत्र्याच्या शेडवर पुरेशा सुविधा नसल्यानेच त्यांचा मृत्यू झाला. मालकाने जिल्हा रुग्णालयात यावे व रमेश यांची पत्नी तसेच दोन मुलींच्या भवितव्याचा विचार करुन मदत करावी, तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही व मृतदेहही ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ॅनिरीक्षक अनिरुध्द अढाव व सहायक फौजदार अतुल वंजारी यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन मालकांशी संपर्क साधून मालक व नातेवाईक यांच्यात समेट घडवून आणला.
भावाच्या मृत्यूच्या धक्कयाने बहिण बेशुध्द
भाऊ रमेश याचा मृत्यू झाल्याचे समजल्याने बहिणीने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. भावाचा चेहरा पाहिल्यानंतर ती बेशुध्द पडली. तोंडावर पाणी मारल्यानंतर ती शुध्दीवर आली. पत्नी पार्वती माहेरी गेलेली असल्याने उशिरापर्यंत आलेली नव्हती. आई यशोदाबाई यांचा प्रचंड आक्रोश सुरु होता. रमेश यांच्या वडीलांचे निधन झाले आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ,मुलगी जागृती (वय ४) व प्रतिज्ञा (वय २) असा परिवार आहे.