मृत्यू ममुराबादला, अंत्यसंस्कार जळगावला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 11:38 AM2020-08-31T11:38:03+5:302020-08-31T11:38:16+5:30
ग्रामस्थांचे हाल : गावात स्मशानभूमीला शेड नाही
ममुराबाद, ता. जळगाव : गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी योग्य स्मशानभूमि नसल्याने गावकऱ्यांची गैरसोय होत आहे. गावकऱ्यांना जळगाव शिवाजीनगर येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
सुमारे १५ हजारावर लोकसंख्या असलेल्या ममुराबाद येथे आजमितीस वापरात असलेली एकही अद्ययावत स्मशानभूमी नाही. परिणामी ग्रामस्थ गावालगतची शेती तसेच जळगाव-विदगाव रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेतच मृतदेहांवर अंत्यसंस्काराची वेळ निभावून जात असली तरी खरे हाल पावसाळ्यात सुरू होतात.
पावसाची झडी सुरू असल्यास बºयाचवेळा ओली लाकडे पेट घेत नसल्याने मृतदेह अर्धवट जळण्याचे प्रकार घडतात. याशिवाय चिखलामुळे प्रचंड अस्वच्छता निर्माण झाल्याने मृतांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांना खूप हाल सहन करावे लागतात.
पाऊस थांबायचे नावच घेत नसल्यास मृतदेह दिवसभर किंवा त्यापेक्षा जास्तवेळ घरात ठेवण्याचा प्रसंग येत असतो.
अशा परिस्थितीत शेवटी नाईलाज म्हणून मृतदेह मालवाहू वाहनातून अंत्यसंस्कारासाठी जळगाव शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीकडे रवाना केला जातो.
तिथेही काहीवेळा जागा नसल्यास बराचवेळ ताटकळावे लागते. या सर्व प्रकाराबद्दल नेहमीच तीव्र नाराजीचा सूर उमटत असताना ग्रामपंचायतीने स्मशानभूमीच्या प्रश्नाकडे अजुनही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. निव्वळ मोक्याची जागा नाही म्हणून रखडलेला स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांनी त्यामुळे पुन्हा एकदा केली आहे.
अंत्यसंस्कारासाठी लागतात घरची लाकडे
एकसारखा पाऊस सुरू असताना ममुराबादच्या ग्रामस्थांकडून जळगाव शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीचा पर्याय निवडला जात असला तरी महापालिकेकडून त्यांना कोणतेच सहकार्य मिळत नाही. अंत्यसंस्कारासाठी वापरली जाणारी लाकडेसुद्धा तिथे पुरविण्यात येत नाहीत. संबंधितांना त्यामुळे मृतदेहासोबत कोरडी लाकडेही घरून नेण्याची व्यवस्था करावी लागते.