‘त्या’ मातेच्या मृत्यूने वैद्यकीय सेवेवर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 12:55 PM2020-05-19T12:55:27+5:302020-05-19T12:55:42+5:30
पंधरा दिवसांची चिमुकली पोरकी : अन्य विकारांवर इलाजच नाही, नातेवाईकाची व्यथा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुक्त होऊनही मृत्यूने गाठलेल्या २१ वर्षीय मातेच्या जाण्याने पंधरा दिवसांची चिमुकली पोरकी झाली़ या मातेचा अचानक होणारा मृत्यू आरोग्य यंत्रणेच्या सुविधा व वैद्यकीय सेवेवर असंख्य प्रश्न निर्माण करणारा आहे़ १७ तारखेला महिलेची सुटी होईल असे डॉक्टरांनी सांगितले व दुसऱ्याच दिवशी मृत्यूचा फोन आला़ या महिलेला अन्य काही त्रास होता का? याकडे डॉक्टरांनी लक्षच दिले नाही, असे सांगत कोरोनाबाधित ते कोरानामुक्त व मृत्यू असा आरोग्य यंत्रणेवर ठपका ठेवणारा धक्कादायक प्रवास एका नातेवाईकांनी ह्यलोकमतह्णकडे मांडला आहे़ चिमुकली पोरकी झाली याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़
लॉकडाऊनमुळे अडकली महिला
ही गर्भवती महिला जळगावला बहिणीकडे २१ मार्चला आलेली होती़ जनताकफर्युनंतर एका दिवसात परत जावू असे ठरले होते़ मात्र, २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाल्याने महिला जळगावात अडकली़ दरम्यान, एप्रिल महिन्यात महिलेची एका खासगी रुग्णालयात प्रसुती झाली व तीने एका मुलीला जन्म दिला़ बाधित आढळल्यानंतर महिलेला कोरोना रुग्णालयातील कक्षात दाखल करण्यात आले होते़ चौदा दिवसानंतर स्वॅब निगेटीव्ह आले मात्र, पंधराव्या दिवशी मृत्यू झाल्याने नातेवाईकांना मोठा धक्का बसला़ या प्रकाराने कोरोना रुग्णालयावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे़ रक्ताच्या गाठी तयार होऊन हृदयाचे ठोके बंद पडून मृत्यू झाल्याचे आम्हाला सांगण्यात येत आहे़ मात्र, कुठलेली मृत्यूचे कारण स्पष्ट करणारे प्रमाणपत्र आम्हाला दिले जात नसल्याचे नातेवाईकाचे म्हणणे आहे़
जिल्हा रुग्णालयाबाहेर रात्रभर थांबून
महिलेची खासगी रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर महिलेला एक दिवस त्रास झाल्याने खासगी रुग्णालयात व्हँटीलेटरची सुविधा नसल्याने महिलेला जिल्हा रुग्णालयात हलविण्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी महिलेचे वडिल व काही नातेवाईकांनी महिलेला तिथे हलविले दाखल केले मात्र, डॉक्टरांनी .... तुम्हाला कोरोना चाचणीशिवाय दाखल करू शकत नाही, असे सांगून जायला सांगितले़ रात्री परतण्याची कसलीच व्यवस्था नसल्याने चिमुकल्यासह ही माता व तिच्या नातेवाईकांनी रात्र बाहेरच काढली़ ही अशी आरोग्य सेवा आहे का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे़
नेमका मृत्यू कसा झाला याचे कारण विचारल्यानंतर रक्ताच्या गाठींनी हृदय बंद पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले़ मग या आजारावर तुम्ही उपचार का केले नाही? ती महिला नुकतीच सिझेरीयन होऊन आली होती, तिच्या अन्य त्रासांकडे लक्ष का दिले नाही, अशी विचारणा डॉक्टरांना करताच त्यांनी फोन बंद केला़ अंत्यसंस्कार झाले, मात्र, आम्हाला अद्याप मृत्यूचे कारण असणारे प्रमाणपत्र मिळाले नाही, नेमके आम्ही काय समाजावे? सर्व काही कागदावर दिसते, प्रत्यक्षात आरोग्य सेवा शून्य आहे़ महिलेचे दुसरीकडे उपचार सुरू असते तर वाचली असती, पंधरा दिवसाची चिमुकली पोरकी झाली नसती
- मृत महिलेचे नातेवाईक