मृत्यूदर आणि डॉक्टरांच्या हजेरीवरुन शासकीय वैद्यकीय यंत्रणा धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 11:47 AM2020-05-12T11:47:04+5:302020-05-12T11:47:19+5:30
डीन आणि सीएस यांच्यातील बेबनावाचीही चर्चा : मृत्यू रोखण्यासाठी आयएमएचे २५० डॉक्टर
जळगाव : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा वाढता मृत्यूदर, शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची हजेरी या मुद्द्यांवरून जिल्हा आरोग्य समन्वय समितीची पहिली बैठक गाजली़ अखेर हा मृत्यू दर रोखण्यासाठी आयएमएकडून २५० डॉक्टर सेवा देतील, असा निर्णय जाहीर करण्यात आला़ या बैठकीत डीन आणि सीएस यांच्यातील बेबनाव मिटावा, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत़
जिल्हा आरोग्य समन्वय समितीची सभा सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली़ यावेळी जि़ प़ अध्यक्षा रंजना पाटील, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार लता सोनवणे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे, सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील, अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण आदीसह शहरातील काही खासगी डॉक्टर व आयएमएचे पदाधिकारी उपस्थित होते़
काही खासगी डॉक्टरांनीही मते व समस्या मांडल्या़ भिलवाडा पॅटर्न यशस्वी ठरला असून तसा काही पॅटर्न आपल्याकडे राबविता येईल का? अशी विचारणा डॉ़ परिक्षित बाविस्कर यांनी केली़ मुकुंद गोसावी यांनी कोरोना रुग्णालय ते डॉ़ उल्हास पाटील रुग्णालयापर्यंत वाहन व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी केली़
प्रश्नांचा मारा अन् पत्रकारांना बाहेर थांबविले़़़
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कागदावर २०९ डॉक्टर असताना प्रत्यक्षात कर्तव्यावर किती डॉक्टर असतात, असा सवाल खासदार रक्षा खडसे यांनी उपस्थित केला़ दरम्यान, लोकप्रतिनिधींकडून असे प्रशासकीय यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना अचानक जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांनी कॅमेरांमुळे बोलता येत नसल्याचे कारण देत नंतर पालकमंत्री संवाद साधतील असे सांगत पत्रकारांना बाहेर थांबण्यास सांगितले़ अनेक डॉक्टरही बराच वेळ बाहेर थांबून होेते़ स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणीही डॉक्टरांनी या बैठकीत मांडल्या़
त्या भुकबळी बाबत चौकशी
शहरातील एका तरूणीने उपासमारीला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले असून या प्रकरणात पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहे़ त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर काय ते ठरवू अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांना दिली़
आयएमएचे डॉक्टर सेवा देणार आहे, मात्र जर शासकीय डॉक्टर अशावेळी सेवा देत नसतील तर हे पाप असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी यावेळी नमूद केले़ सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले़
डीन व सीएस यांनी वाद बाजूला सारावा : पालकमंत्री
अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांच्यातील मतभेदाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर त्यांनी वाद बाजूला सारून रुग्णांवर लक्ष ठेवणे याच सूचना दिलेल्या असून सर्वांनी मिळून काम करायचे असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले़ वाढता मृत्यू दर रोखण्यासाठी आयएमएची सेवा घेण्यात येणार आहे़ जो शासकीय डॉक्टर कर्तव्यात कसूर करेल त्यावर कारवाई केली जाईल, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले़
मृत्यूदर सर्वात जास्त कसा? आमदार किशोर पाटील
जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्यू दर हा सर्वाधिक आहे़ याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असून निधी, आॅक्सिजन, सर्व यंत्रणा असताना मृत्यू का रोखू शकत नाही? असा सवाल आमदार किशोर पाटील यांनी उपस्थित केला व उपाययोजनांची मागणी केली़ अधिकाऱ्यांमधील मतभेदामुळे कोविड रुग्णालयच डॉ़ उल्हास पाटील रुग्णलयात हलवा असेही ते म्हणाले़ रुग्णांना आॅक्सिजन वेळेवर मिळत नाही, या बाबींवर लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली़
या होणार चाचपण्या
३० बेडचे आयसीयू शंभर बेडचे करणार, शाहू महाराज रुग्णालय कोविड रुग्णालय होऊ शकते का? कोरोना रुग्णालयाची क्षमता वाढविणाऱ मोहाडी येथील महिला रुग्णालयाचा वापर कोविडसाठी होऊ शकतो का? याबाबत चर्चा झाली़ डॉ़ उल्हास पाटील रुग्णालयापर्यंत व्यवस्था म्हणून काही खासगी स्कूल बसेस लावता येतील का?