जळगाव शहरातील लॉजमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 07:55 PM2018-02-03T19:55:16+5:302018-02-03T20:01:00+5:30
व्यसनामुळे पत्नीशी सातत्याने वाद होत असल्याने भजे गल्लीतील लॉजमध्ये वास्तव्याला असलेले धनंजय शंकरराव भदाणे (रा.विद्या नगर, पिंप्राळा, जळगाव) या सेवानिवृत्त शिक्षकाचा शनिवारी मृत्यू झाला. मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. याबाबत जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,३ : व्यसनामुळे पत्नीशी सातत्याने वाद होत असल्याने भजे गल्लीतील लॉजमध्ये वास्तव्याला असलेले धनंजय शंकरराव भदाणे (रा.विद्या नगर, पिंप्राळा, जळगाव) या सेवानिवृत्त शिक्षकाचा शनिवारी मृत्यू झाला. मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. याबाबत जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भदाणे हे १ जानेवारीपासून भजे गल्लीतील सुशांत लॉजमध्ये राहायला आले होते. लॉजचे दररोज ते भाडे देत होते. त्यामुळे लॉजचा कर्मचारी शनिवारी त्यांच्या खोलीत गेला. आतून दरवाजा बंद असल्याने कर्मचा-याने दरवाजा ठोठावला. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने या कर्मचा-याने व्यवस्थापक मेघराज नाईक यांना ही माहिती दिली. त्यांनी जिल्हा पेठ पोलिसांना कळविल्यानंतर उपनिरीक्षक कविता भुजबळ व सहका-यांनी घटनास्थळी भेट दिली. बेशुध्दावस्थेत असलेल्या भदाणे यांना जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
भदाणे यांचा ह्दयविकाराने मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भदाणे यांना मयूरी ही एक मुलगी असून ती विवाहित असून बेंगलोर येथे वास्तव्यास आहे. लहान बंधू राजेंद्र भदाणे हे औरंगाबाद येथे आहेत. गेल्या वर्षी धनंजय भदाणे यांना न्यूमोनिया झाला होता. महिनाभर दवाखान्यात राहिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मद्यपान तसेच सिगरेट न घेण्याच्या सुचना केल्या होत्या. याच विषयावरून पती आणि पत्नीमध्ये मतभेद होत असायचे. त्यामुळे धनंजय भदाणे हे लॉजमध्ये थांबून त्यांनी मद्यपान सुरू ठेवले होते.