रस्ते आणि मनपा प्रशासनाचा मृत्यू; आयुक्तांचे केले सांत्वन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:17 AM2021-07-29T04:17:20+5:302021-07-29T04:17:20+5:30
जळगाव : अमृत आणि मलनिस्सारण योजनेच्या कामांमुळे रस्त्यांचा खोदून-खोदून जीव घेतला गेला आहे. त्यामुळे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली ...
जळगाव : अमृत आणि मलनिस्सारण योजनेच्या कामांमुळे रस्त्यांचा खोदून-खोदून जीव घेतला गेला आहे. त्यामुळे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. एवढेच नाही तर रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या यंत्रणेचासुद्धा मृत्यू झाला आहे, असा आरोप करीत माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्यासह पाच ते सहा जणांनी बुधवारी सकाळी ११ वाजता मनपा आयुक्त सतीश कुळकर्णी यांच्याकडे दुखवटा व्यक्त करीत त्यांच्या दालनात ठिय्या मांडला.
शहरातील रस्त्यांची अत्यंत दुर्दक्षा झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, अशी अवस्था झाली असून, अमृत व मलनिस्सारण योजनेंतर्गत रस्त्यांचा खोदून-खोदून जीव घेण्यात आला आहे. तर रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या यंत्रणेचासुद्धा मृत्यू झाला आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. रस्त्यांवर प्रचंड चिखल होत आहे. चिखलामुळे दुचाकी, सायकल घसरून अपघात होत आहेत. रोज कुणी ना कुणी जखमी होत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांचा व यंत्रणेचा मृत्यू झाल्यासारखी अवस्था पाहता, आयुक्तांचे सांत्वन करण्यासाठी बुधवारी सकाळी दीपककुमार गुप्ता यांच्यासह अजय महाडिक, मतीन पटेल, विजय सांगोरे, राजेंद्र नन्नवरे, महेश पाटील, दीपक बाविस्कर, योगेश कदम, कवी कासार, अमोल कोल्हे आदींनी आयुक्तांचे कार्यालय गाठले होते. त्यानंतर गुप्ता यांनी शहरातील रस्त्यांची स्थिती आयुक्तांसमोर मांडली.
खड्ड्यांना वाहिली फुले
मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या मांडल्यानंतर दीपककुमार गुप्ता यांच्यासह काही जणांनी शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांना फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली. मनपा परिसर, टॉवर चौक, तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान परिसरातील खड्ड्यांना फुले वाहण्यात आली, तसेच रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.