नाशिक येथील एकाची फाशीच्या शिक्षेतून मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:31 PM2019-05-04T12:31:49+5:302019-05-04T12:32:18+5:30
अॅड. अनिकेत निकम यांनी केला युक्तीवाद
जळगाव: नाशिक येथील पल्लवी संसारे व विशाल संसारे या माय-लेकाच्या खून प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी रामदास शिंदे याची मुंबई उच्च न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी फाशीच्या शिक्षेतून निर्दोष मुक्तता केली आहे़ अॅड. अनिकेत निकम यांनी उच्च न्यायालयात युक्तीवाद केला.
सन २०१६ च्या एप्रिल महिन्यात पल्लवी संसारे (३४) व त्यांचा मुलगा विशाल (६) यांचा धार-दार शस्त्राने खून करण्यात आला़
याप्रकरणी मयत पल्लवी यांचे पती कचरू संसारे यांच्या फिर्यादीवरून रामदास शिंदे याच्याविरूध्द सातपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़
नाशिक जिल्हा आणि सत्र नायालयात खटला चालला. यात न्यायालयाने आरोपी रामदास शिंदे याला २६ एप्रिल २०१८ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती.
शिंदे याने मुंबई उच्च न्यायालयातील वकील अॅड़ अनिकेत निकम यांच्यामार्फत न्यायालयाच्या या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले.
अॅड़ निकम यांनी आरोपीला फाशी ठोठावण्या इतपत कोणताच पुरावा न्यायालय पुढे नाही, एवढेच नव्हे तर संपूर्ण खटल्यात कोणताच प्रथम दर्शनी साक्षीदार नसून संपूर्ण केस ही परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारीत आहे.
परिस्थिजन्य पुराव्याची सबळ साखळी सरकारी वकिलांनी कोर्टात मांडली नाही आणि अश्या परिस्थितीत शिंदे याला फाशीची शिक्षा देणे चुकीचे असून त्यांची सदोष मुक्तता करण्यात यावी, असे न्यायालयात पटवून दिले़
रिकव्हरी पंचनाम्यात चाकूवर रक्त असल्याचे उल्लेख नाही़ परंतु रासायनिक विश्लेषण अहवालात चाकूवर रक्त आहे असे नमूद करण्यात आले त्यामुळे पुराव्याशी छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येत नाही असे निकम यांनी पटवून दिले़
त्यानंतर सरकार पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला़ दोन्ही पक्षांकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्य खंडपीठाचे न्यायमूर्ती बी़पी़धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी शिदे याची फाशीच्या शिक्षेतून निर्दोष मुक्तता केली आहे़