सहावर्षीय कोरोनाबाधित मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:17 AM2021-04-28T04:17:17+5:302021-04-28T04:17:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाची दुसरी लाट सर्वच वयोगटासाठी धोकादायक ठरत आहे. मंगळवारी हंबर्डी, ता. यावल येथील एका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाची दुसरी लाट सर्वच वयोगटासाठी धोकादायक ठरत आहे. मंगळवारी हंबर्डी, ता. यावल येथील एका सहावर्षीय मुलाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला. या मुलाला रविवारी रात्री गंभीरावस्थेत दाखल करण्यात आले होते.
हंबर्डी येथील या मुलाची तब्येत खराब झाल्यानंतर पालकांनी त्याला सुरुवातीला जळगावात एका खासगी रुग्णालयात रविवारी सकाळी दाखल केले. या ठिकाणी या मुलाची ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली. यात तो बाधित असल्याचे समोर आले. त्यानंतर रुग्णालयाने त्याची उपचाराची फी सांगितली. मात्र, कुटुंब गरीब असल्याने त्यांनी त्या ठिकाणाहून या मुलाला न्हावी ग्रामीण रुग्णालयात हलविले; मात्र त्या ठिकाणी या मुलाला श्वास घ्यायला त्रास हाेत असल्याने त्याला व्हेंटिलेटर लागू शकेल, असे सांगितले. त्यानंतर रविवारी रात्री साडेनऊ वाजता या मुलाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी बायपॅप मशीन लावण्यात आले होते. मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास या मुलाची प्राणज्योत मालवली. अंत्यसंस्कारासाठी हंबर्डी येथेच या मुलाचा मृतदेह नेण्यात आला.
चौथ्या मुलाचा मृत्यू
पहिल्या लाटेत कोरोनाचा धोका दूरच मात्र कोरोनाबाधित होण्याचे प्रमाणही लहान मुलांमध्ये अगदीच कमी होते. मात्र, दुसऱ्या लाटेत हे प्रमाण वाढले आहे. संसर्ग लहान वयोगटातही वाढला असून, मुले गंभीर होत आहे. गेल्या दोन महिन्यात शून्य ते ६ वयोगटातील चार मुलांचा मृत्यू झाला आहे. यात अमळनेर येथील दोन वर्षीय बालक, पाचोरा येथील एक चारवर्षीय चिमुकली, पाच दिवसांचे एक बाळ व आता हंबर्डी येथील सहावर्षीय मुलाचा मृतांमध्ये समावेश आहे. अशा स्थितीत पालकांनी मुलांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.