बेदम मारहाणीत जळगाव जिल्ह्यातील भोकरी येथे विद्यार्थी मृत्यूमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 06:26 PM2019-01-27T18:26:26+5:302019-01-27T18:26:52+5:30
कौटुंबिक वाद सोडविणे बेतले जीवावर
पिंपळगाव हरेश्वर, जि. जळगाव : कौटुंबिक वादातून उद््भवलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या अदील अन्वर काकर (१७) रा. भोकरी, ता. पाचोरा या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यास बेदम मारहाण करण्यात आल्याने तो मृत्यूमुखी पडला. थरकाप उडविणारी ही घटना २६ रोजी प्रजासत्ताकदिनी सकाळी भोकरी येथे घडली. या प्रकरणी अशफाक उर्फ इमरान रशीद काकर (२४), तौसीब रशीद काकर (२२), नसीबा रसीद काकर (४०), शाहीन फिरोज काकर (२५), रशीद उस्मान काकर (४९) सर्व रा. भोकरी, ता. पाचोरा यांना अटक करण्यात आले असून त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावन्यात आली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भोकरी येथील हमीद करीम काकर व त्यांचे नातेवाईक असलेले अशफाक उर्फ इमरान रशीद काकर, तौसीब रशीद काकर, नसीबा रसीद काकर, शाहीन फिरोज काकर, रशीद उस्मान काकर यांचे काही कौटुंबीक वाद आहे. २६ रोजी हे वाद विकोपाला गेले व त्यातून वरील पाचही जणांनी लाठ्या-काठ्या घेऊन हमीद करीम काकर व त्यांचे नातेवाईकांना मारहाण केली. या वेळी अदील अन्वर काकर (१७) हा विद्यार्थी भांडण सोडविण्यासाठी गेला. त्याचा राग येऊन अदील यास जमिनीवर आपटून लाथा बुक्यांनी त्याच्या छातीवर-पोटावर मारहाण करण्यात आली. त्यात तो जागीच ठार झाला.
या प्रकरणी नसीम इस्माईल काकर (४०) यांच्या फिर्यादीवरून अशफाक उर्फ इमरान रशीद काकर, तौसीब रशीद काकर, नसीबा रसीद काकर, शाहीन फिरोज काकर, रशीद उस्मान काकर यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४८ ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड यांच्या मार्गदर्शनाखाली पहूरचे सहायक पोलीस निरीक्षक शिरसाट, उपविभागीय कार्यालयातील पथक, पिंपळगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील व व त्यांचे सहकारी गावात पोहचले. २७ रोजीदेखील बंदोबस्त कायम होता. पाचही आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती गजेंद्र पाटील यांनी दिली.
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
सुरुवातील या प्रकरणातील केवळ चार आरोपींना अटक करण्यात आले होते. त्यामुळे पाचव्या आरोपीलाही अटक करीत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्रा घेण्यात आल्याने रशीद उस्मान काकर यासही अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री ९ वाजता मृतदेह ताब्यात घेण्यात आला व रात्री दफन विधी करण्यात आला.