अमळनेरात कोरोनाग्रस्त मृतांची संख्या चारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 09:53 PM2020-04-27T21:53:33+5:302020-04-27T21:53:38+5:30
१२ निगेटीव्ह : मिळाला दिलासा
अमळनेर : प्रशासनाच्या बदलत्या भूमिका, छुप्या मार्गाने नागरिकांचा तालुक्यात शिरकाव आणि जनतेचा बेफिकिरपणा यामुळेच कोरोनाचा तालुक्यात शिरकाव झाला असून संपूर्ण अमळनेर शहर कोरोनाच्या दहशतीखाली आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाच्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १३ असून त्यातील शहरातील रुग्णांची संख्या १२ झाली आहे. पैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे तर काही संशयित मृत्यू झालेल्यांचा आणि तपासणी झालेल्यांचा अहवाल बाकी आहे. २७ पासून मात्र गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे
सुरुवातीला संशयितांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यावेळी त्या भागातील नागरिकांना देखील सावध करण्यात आले नाही किंवा मीडियाला देखील पुरेशी माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे जनता बिनधास्त वावरत होती. त्याच वेळी सीमा बंदी झाली खरी , नाके सील झाले मात्र छुप्या मार्गांचा प्रशासनाने विचारच केला नाही. त्याचे परिणाम असे झाले की हजारो लोक पुणे, मुंबई, सुरत , नाशिक व इतर ठिकाणाहून शहरात व तालुक्यात आले. नंतर प्रशासनाला मिळालेल्या माहितीवरून हळू हळू काहींना क्वारंन्टाईन केले. आधी घरातच थांबण्यास सांगितले गेले. त्यावेळीही जनतेने शिस्त पाळली नाही तर दुसरीकडे काही दिवसातच अशा लोकांना संस्थात्मक कोरोन्टाईन करण्याच्या सूचना मिळाल्या. त्यावेळी ग्रामीण भागात पुरेसे नियम पाळले गेले नाहीत. तर शहरात देखील सायंकाळी कोरोंटाईन झालेले लोक एकत्र आले. किती लोकांना क्वारंटाईन केले याचीही माहिती जनतेपर्यंत पोहचली नाही. त्यामुळे कुठून कोण जाणे कोरोनाचा तालुक्यात शिरकाव झाला. मध्यंतरी नगरपालिकेने देखील एक नव्हे दोन तीन वेळेस भाजीपाला लिलावचे ठिकाणे बदलले. अम्लेशवर नगर भागात देखील एकदा लिलावचे ठिकाण झाले होते.
प्रतिबंधक क्षेत्रात
न.पा. कर्मचारी मदतीला
प्रतिबंधक क्षेत्रातील लोकांचे हाल होऊ नये म्हणून नगरपरिषदेने बॅरीकेट्स लावलेल्या ठिकाणी १० कर्मचारी तैनात केले असून ज्यांना जीवनावश्यक वस्तू घ्यायच्या असतील त्यांनी तिथपर्यंत येऊन वस्तू मागवायच्या आहेत. त्यांना त्या पोहोचविण्यात येणार आहेत. सील केलेल्या भागातील बारी नामक दूध विक्रेत्याला घरोघरी दुधाच्या पिशव्या पोहचविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे
निवासी भागात किराणा दुकान व भाजीपाला विक्रीला बंदी नाही
शहरातील मुख्य बाजारपेठेत किराणा दुकान बंद ठेवून भ्रमणध्वनी अथवा नगरसेवक ,स्वयंसेवक व दुकांदारांच्या माध्यमातून घरपोच सेवा देण्याचे आवाहन केले आहे. परंतु निवासी भागात, गल्ली बोळात असणारी लहान किराणा दुकान सुरू राहतील आणि हातगाडीवर भाजीपाला विक्री करता येईल. त्यांना बंदी नाही अशी माहिती तहसीलदार मिलिंद वाघ व मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांनी दिली. दुकानदारांना जीवनावश्यक वस्तूंचा दर निश्चित करण्यास सांगितले आहे. आणि ज्या वस्तू कॉमन आहेत त्यांना घरपोच पोहचवा निवडीचे पर्याय असलेल्या वस्तूमुळे गोंधळ करू नये किंवा नागरिकांनी त्या वस्तूचे नाव द्यावे अथवा उपलब्ध वस्तू स्वीकाराव्यात.
तालुका कृषी अधिकारी भारत वारे यांनी उत्पादक शेतकऱ्यांकडून माल मागवला असून पिशव्यांच्या माध्यमातून ५० ते २०० रुपये किमतीच्या काही भाजीपाला असलेल्या पिशव्या घरपोच देण्यात येत आहेत. त्यामुळे बाजारातील गर्दी टाळण्यात यश आले व संपर्क टळला आहे.
१२ निगेटीव्ह : मिळाला दिलासा
अमळनेर तालुक्यातील रुग्णांची संख्या १३ झाली असून त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. संशयित मयतांचे अहवाल बाकी असले तरी कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील १२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याने अमलनेरकराना दिलासा मिळाला आहे.