रांजणगावात मृत्यूचे तांडव अन् पोरकेपणाचा आघात मुलांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:38 PM2020-03-24T23:38:05+5:302020-03-24T23:39:53+5:30

सात शेतमजुर महिलांना विषबाधा झाली. यापैकी चार जणींचे घास मृत्यूने गिळले. एवढ्यावरचं मृत्यूचे भय संपले नाही. यमदुताने ठाण मांडून रहावे. अशी सुन्न करणारी परिस्थिती.

Death toll and death trauma in children | रांजणगावात मृत्यूचे तांडव अन् पोरकेपणाचा आघात मुलांवर

रांजणगावात मृत्यूचे तांडव अन् पोरकेपणाचा आघात मुलांवर

Next
ठळक मुद्देआॅन द स्पॉट रिपोर्टविषबाधा आणि हा:हाकारमाय-लेकी गेल्याने मुले उघड्यावरगावाची एकजूट... पेटला माणुसकीचा दीप

जिजाबराव वाघ ।
चाळीसगाव, जि.जळगाव : जहीर सात वर्षांचा. जोया ११ वर्षांची. दोघेही शाळेत जाणारे. आई आणि आजीच्या पंखांखाली वाढणारे. वडील आणि आजोबांचे छत्र यापूर्वीच हरवलेले. अचानक एखादं वादळ यावं... होत्याचं नव्हतं व्हावं, असं मृत्यू तांडव रांजणगावात घडलं. आईसोबत आजीही पैगंबरवासी झाल्याने जोया आणि जहिरच्या पालनपोषणाचा प्रश्न मृत्यूच्या दुर्दैवी फेऱ्यानंतरही कायम आहे. रांजणगावात ग्रामस्थांच्या संवेदनशीलतेने माणुसकीचे निवे पेटवित जाती - धर्माच्या पलिकडे पाहत मदतीचा ओघ उभारला असला तरी अधिक हात पुढे आले पाहिजेत. जोया आणि जहीरच्या निरागस डोळ्यांमध्ये अपेक्षांचे हेच अश्रू तेवढे शिल्लक राहिले आहेत. त्यांची नजर सारखी 'अम्मी' आणि 'दादी'ला शोधत असते...
चाळीसगाव शहराच्या दक्षिणेला अवघ्या पाच किमी अंतरावर असणाºया रांजणगावात ५०० उंबऱ्यांच्या छताखाली तीन हजार लोकसंख्या गुण्यागोविंदाने नांदते. गावात सर्वधर्मीय एकोपा आदर्श ठरावा. २४ फेब्रुवारीचा दिवस मात्र गावासाठी मृत्यूचे सावट घेऊन उगवला. सात शेतमजुर महिलांना विषबाधा झाली. यापैकी चार जणींचे घास मृत्यूने गिळले. एवढ्यावरचं मृत्यूचे भय संपले नाही. यमदुताने ठाण मांडून रहावे. अशी सुन्न करणारी परिस्थिती. सात शेतमजूर महिलांपैकी सहा मुस्लीम तर एक हिंदूधर्मीय. जशी अनेक रंगांची फुले एखाद्या माळेत ओवलेली असतात, तशीच त्यांची एकमेकात गुंफलेली नाती... तसाच भाईचारादेखील. बचावलेल्या तिघेही महिला रुग्णालयातून घरी परतल्या असल्या तरी त्यांच्या मनावर मृत्यूच्या भीतीचे ओरखडे अजूनही ताजे आहेत. उर्वरित चारही कुटुंंबे मात्र घरातील 'मातृत्व' हरपल्याने अजूनही शोकमग्न आहेत. यात पहिलीत जाणारा जहीर आणि सहावीत शिकणारी जोया यांच्या वाट्याला आलेले अनाथपणाचे दु:ख मन हेलावून टाकते. त्यांच्या डोक्यावरुन सतत मायेनं फिरणारे आई आणि आजीचे हात मृत्यूने हिसकावून घेतले आहे. त्यांचं आजी-आई सोबतचं सुंदर भावविश्वच उन्मळून पडलेयं. घर आहे... सगळेच जिथल्या तिथे आहेत. मग 'अम्मी' आणि 'दादी मॉ' गेल्या कुठे? याने ते कासावीस होतात. न थांबणाºया अश्रूंना वाट मोकळी करून देतात.
विषबाधा आणि हा:हाकार
विषबाधा झालेल्या सातही महिलांची कौटुंबिक परिस्थिती बेताची. हातावर पोट असणारी. दिवस उजाडला की, त्यांची पावलं मजुरीसाठी शेताकडे निघायची. २४ फेब्रुवारी रोजी मड्डीबी भिकन शेख (४६), संगीता संतोष चव्हाण (७५), अलमुन शेख बशीर (३५), महिरोबी बशीर शेख (५०), अफ्रीन बानो शेख शफी (१९), अमिना शेख लियाकत (वय १८), हिना अफजल शेख(३०) या सातही महिला कन्नड रस्यालगतच्या लालबर्डी शिवारातील शेतात काम करण्यासाठी पोहचल्या. दुपारी शेतात पडलेल्या एका बादलीतून त्यांनी पाणी पिले. यानंतर काही वेळातच त्यांना चक्कर येण्यासह उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांना विषबाधा झाल्याचे लक्षात येताच सातही महिलांना चाळीसगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार्थ दाखल केले गेले. यात मड्डीबी शेख, संगीता चव्हाण, अलमून शेख, महिरोबी शेख यांची मृत्यूशी सुरु असणारी झुंज अपयशी ठरली. उर्वरित तिघी आता सुखरुप आहेत.
माय-लेकी गेल्याने मुले उघड्यावर
अलमुन शेख ही ३५ वर्षीय विधवा आपली ५० वर्षीय विधवा आई महिरोबी शेखसोबत गेल्या सात वर्षांपासून राहत होती. अलमूनला जहीर आणि जोया अशी दोन मुले. दोघेही रांजणगाव येथेच शाळेत जातात. आजी आणि आईच्या मृत्युमुळे ही मुले पोरकी झाली आहेत. आईच्या मृत्यूनंतर आजी महिरोबीने २२ दिवस मृत्युशी झुंज दिली. मात्र १७ रोजी तिनेही अखेरचा श्वास घेतला. संगीता चव्हाण यांची एक मुलगीदेखील पोरकी झाली आहे.
मड्डीबीचे कुटुंबीयदेखील या दु:खातून अजूनही सावरलेले नाही.
गावाची एकजूट... पेटला माणुसकीचा दीप
रांजणगावात शोककळा पसरली असताना ग्रामस्थांनी एकजूट दाखवत या दु:खाचा क्रूर आघात झेलला. शिक्षिका असणाºया सरपंच सोनाली निंबाळकर त्यांचे पती शेखर निंबाळकर, माजी सरपंच अमजद पठाण, प्रमोद चव्हाण यांनी मदतीची साद घालताच ग्रामस्थांच्या शेकडो ओंजळी पुढे आल्या. सातही महिलांच्या उपाचारासाठीचा सर्व खर्च गावाने लोकसहभागातून उभा केला. तीन लाख २० हजार रुपये संकलित झाले. 'मजहब नही सिकाता आपस में बैर रखना...' असाच माहोल तयार झाला. जाती - धर्माच्या पलिकडे जाऊन 'माणुसकीचा सेतू' उभा राहिला.
डॉक्टर हे दुसरे देवदूत असतात. याचा प्रत्यय सर्जन असणाºया डॉ.जयवंतराव देवरे यांच्या रुपाने आला. डॉ.देवरे हे मूळचे रांजणगावकर. त्यांनीही आपल्या गावाशी असलेली नाळ जपत चाळीसगावी त्यांच्या खासगी रुग्णालयात विषबाधा झालेल्या सातही महिलांवर उपचारांची शर्थ केली. तीन महिलांना वाचविण्यात त्यांना यश आले. मदतीच्या ओंजळीतील एक 'मोठी' ओंजळ त्यांचीही आहे.

Web Title: Death toll and death trauma in children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.