जामनेरला मृत्यूची माहिती लपविल्याने मृतांची संख्या कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 03:11 PM2020-08-16T15:11:28+5:302020-08-16T15:12:36+5:30
कोरोना संसर्गाच्या कालावधीत सर्वसाधारण मृत्यूदरात जामनेर शहरात वाढ झाली असली तरी बाधितांचे मृत्यू म्हणून त्यांची गणना झालेली नाही.
मोहन सारस्वत
जामनेर : कोरोना संसर्गाच्या कालावधीत सर्वसाधारण मृत्यूदरात जामनेर शहरात वाढ झाली असली तरी बाधितांचे मृत्यू म्हणून त्यांची गणना झालेली नाही. एप्रिल व मे या दोन महिन्यात वृद्धापकाळाने किंवा अन्य व्याधींनी ग्रस्त असलेल्यांचे मृत्यू मोठ्या प्रमाणात झाले कारण त्यांना मधुमेह, रक्तदाब, किडनी विकार अथवा इतर आजार असल्याने व त्यात कोरोनाची भर पडली. असे असले तरी असे मृत्यू लपविण्यात आल्याचे बोलले जाते.
एप्रिल व मे महिन्यात शहरात कोरोनाची मोठी भीती नागरिकांमध्ये होती. या कालावधीत शहरात व्याधीग्रस्त वृध्दांच्या मृत्यूत वाढ झाली. ज्यांच्या घरात कोरोना बाधित होते तेथे मयतांची संख्या दिसून आली. नातेवाईकांनी आरोग्य विभाग किंवा प्रशासनास न कळवता परस्पर मृतकांवर अंत्यसंस्कार केल्याने त्यांची नगरपालिकेकडे नोंद झाली नाही.
पालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात मे ते आॅगस्ट या कालावधीत बाधितांची संख्या ३३१ व मयतांची १२ आहे.
वास्तविकत: या कालावधीतील मृत्यूची संख्या निश्चितच जास्त आहे. बाधिताच्या कुटुंबातील मयताचे स्वॅब घेऊन नंतरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणे गरजेचे असतांना त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
मृत्यूदर नेहमीपेक्षा जास्त नाहीच
एप्रिल ते जुलै या महिन्यात मृत्यू दर हा नेमीच्या मृत्यू दरापेक्षा जास्त नसून तो जवळपास नेहमीच्या मृत्यू दराइतकाच होता. वृद्धापकाने मृत्यू हे कारणसुद्धा मृत्यूच्या कारणांमध्ये असते. या काळात जे वृद्ध किंवा व्याधीग्रस्त होते त्यांना कदाचित कोरोना संसर्ग तत्काळ झाला व अन्य कारणाने किंवा वृद्धापकाळाने जरी त्यांचा मृत्यू झाला असला तरी कोरोना संसर्ग असल्यामुळे त्याच्या मृत्यूची गणना कोरोना मृत्यूमध्ये करण्यात आली असावी. भीती, सर्वत्र बंद, सर्वच प्रसार माध्यमातील बातम्यांमध्ये मृत्यूविषयीचे वृत्तांकन यामुळे समाजमनामध्ये अधिक भीती पसरली. केवळ कोरोना रुग्ण व त्यापैकी मृत्यूदर काढल्यामुळे हा आकडा जास्त आला असला तरी नेहमीच्या मृत्यूदराच्या जवळपासच तो होता.
- डॉ.राजेश सोनवणे, तालुका आरोग्याधिकारी, जामनेर
--------------------------------------------------------
महिना बाधित मयत
---------------------------------------------------------
मे ३ २
जून १२० ५
जुलै ७६ ४
आॅगस्ट १३२ १
---------------------------------------------------------
एकूण ३३१ १२
--------------------------------------------------------