मृत्यू घटल्याने स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांची संख्या ४ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:15 AM2021-05-24T04:15:06+5:302021-05-24T04:15:06+5:30
रिॲलिटी चेक महिनाभरानंतर शांतता; नातेवाईक घेऊन जातात अस्थी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मार्च-एप्रिल महिन्यात जिल्हाभरात कोरोनाने अक्षरशः हाहाकार ...
रिॲलिटी चेक
महिनाभरानंतर शांतता; नातेवाईक घेऊन जातात अस्थी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मार्च-एप्रिल महिन्यात जिल्हाभरात कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजविला होता. बाधित व संशयित तरुणांचे मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढल्याने स्मशानभूमीत अंत्यसंस्कारालाही जागा उपलब्ध होत नसल्याचे भीतीदायक चित्र होते. नेरी नाका स्मशानभूमीत दिवसाला ३४ पर्यंत अंत्यसंस्कार केले जात होते. मात्र, महिनाभरानंतर मृत्यू घटल्याने या स्मशानभूमीत आता दिवसाला चार ते पाच अंत्यसंस्कार होत असल्याने ही मोठी दिलासादायक बाब असल्याचे येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय पुरेसा वेळ असल्याने मृतांच्या अस्थीही नातेवाईक घेऊन जात आहेत. महिनाभरापूर्वी मात्र चित्र वेगळे होते.
कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. मार्च-एप्रिलदरम्यान बाधितांसह सारी या आजाराचे मृत्यू प्रचंड वाढले होते. त्यामुळे एका दिवसाला अंत्यसंस्कार मोठ्या प्रमाणात होत असल्याने स्मशानभूमीत जागेची अडचण निर्माण होत होती. या ठिकाणी नवीन सहा ओटे बांधण्यात आले होते. मात्र, तेही अपुरे पडत होते. अनेकांवर खाली अंत्यसंस्कार करावे लागत होते. या परिस्थितीत येथील कर्मचाऱ्यांची प्रचंड धावपळ उडत होती. पूर्ण चोवीस तास त्यांना स्मशानभूमीत काढावे लागत होते. या ठिकाणी शवदाहिनीचेही काम करण्यात आले असून, यातही अनेक मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
राख न्यायलाही यायचे नाही नातेवाईक
महिना-दीड महिन्यापूर्वी मृतांची संख्या प्रचंड असल्याने जागेची अडचण होती. एकूण अंत्यसंस्कारांपैकी ६० टक्के नातेवाईक राख घेऊन जात होते. मात्र, अनेकांचे नातेवाईक ही राख घ्यायला येत नव्हते. त्यामुळे कर्मचारी ओट्यावरून ती राख बाजूला काढून ठेवत होते. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अधिक मृत्यू झाले. मात्र, दुसऱ्या लाटेपेक्षा पहिल्या लाटेत नातेवाईक समोरच येत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. पहिल्या लाटेत कसलाच अनुभव नसल्याने शिवाय भीती असल्याने नातेवाईक समोर येत नसत, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसऱ्या लाटेत मात्र भीती कमी असल्याने नातेवाईक पुढे येत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मृतदेहही वेटिंगवर
कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वाढल्याने रुग्णालयात रुग्णांना वेटिंगवर राहावे लागत होते. त्यातच मृतांचे प्रमाण दुसरीकडे प्रचंड वाढत असल्याने अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आधीच नोंदणी करून ठेवावी लागत होती. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी वेटिंगवर राहत होते. दिवसाला ३४ अंत्यसंस्कार होत होते. त्यामुळे स्मशानभूमीतील ओटे कमी पडत होते, अशा स्थितीत एका मृतावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर चार ते पाच तासांत त्यांची राख बाजूला काढून तातडीने दुसऱ्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने कर्मचारीच राख बाजूला काढून ठेवत होते. नातेवाईक त्यावेळेस आल्यास त्यांना अस्थी मिळत होत्या. कुणी न आल्यास कर्मचारीच ती फेकून देत होते.
गेल्या महिनाभरापूर्वी स्मशानभूमीत एका दिवसाला ३० ते ३५ अंत्यसंस्कार केले जात होते. हळूहळू हे प्रमाण आता कमी होऊन दहापेक्षाही खाली आले आहे. सुरुवातीला नातेवाइकांमध्ये प्रचंड भीती असल्याने ते अस्थी घेण्यासाठीही येत नव्हते. आता ही भीती कमी झाल्याने नातेवाईक समोर येतात, शिवाय गेल्या महिन्याच्या तुलनेत मृत्यूही कमी झाले आहेत.
- धनराज सपकाळे, स्मशानभूमी रक्षक.