जळगावातील मृतांची संख्या ५०० वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:15 AM2021-05-01T04:15:50+5:302021-05-01T04:15:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील तीन कोरोना बाधितांचा शुक्रवारी मृत्यू झाला. यामुळे शहराची एकूण मृतांची संख्या ५०२ वर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील तीन कोरोना बाधितांचा शुक्रवारी मृत्यू झाला. यामुळे शहराची एकूण मृतांची संख्या ५०२ वर पोहोचली आहे. एप्रिल महिन्यात शहरात सातत्याने कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, नवे १४१ रुग्ण आढळले असून १५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव ग्रामीणमध्ये २० बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्याच्या २२ टक्के मृत्यू हे जळगाव शहरात झाले आहेत. एकत्रित तालुक्याची आकडेवारी बघता तालुक्यात ६२० बाधितांचे मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. अन्य कुठल्याही तालुक्यापेक्षा अडीच ते तीनपटीने ही संख्या अधिक आहे. शहरात बाधितांची संख्याही अधिक असल्याने ही स्थिती आहे. शुक्रवारी झालेल्या मृत्यूमध्ये ३८, ५४ वर्षीय पुरुष व ७० वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे. यासह जिल्ह्यात भुसावळ, पाचोरा, चोपडा तालुक्यात प्रत्येकी ३ तर रावेर, बोदवड, चाळीसगाव, भडगाव या ठिकाणी प्रत्येकी २ व जळगाव ग्रामीणमध्ये एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.
चाचण्या अशा
ॲन्टिजेन ६,४८१, बाधित ७७९
आरटीपीसीआर आलेले अहवाल : २२८८, बाधित २२८
आरटीपीसीआर पाठविलेले अहवाल : २५१८
हयात, ज्युपिटर रुग्णालयांना नोटिसा
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी पाहणी केल्यानंतर काही गंभीर त्रुटी आढळून आल्याने शहरातील हयात व ज्युपिटर या दोन रुग्णालयांना डॉ. चव्हाण यांनी नोटिसा बजावल्या आहेत. दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. गंभीर रुग्ण असताना कंन्सलटंट डॉक्टर उपस्थित नसणे, दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, ट्रेन स्टाफची कमतरता, सोशल डिस्टन्सिंग नसणे, कर्मचाऱ्यांनी मास्क व ग्लोव्हज परिधान न करणे आदी बाबी आढळून आल्या. दरम्यान, हयात हॉस्पिटलमध्ये बॉम्बे नर्सिंग ॲक्टचे प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते, शिवाय इलेक्ट्रिक फायर ऑडिट झालेले नव्हते, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. दोन दिवसात खुलासा सादर न केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.