निवडणूक कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 06:35 PM2019-04-24T18:35:17+5:302019-04-24T18:36:53+5:30
लोकसभा निवडणुकीत कर्तव्यावर असताना कर्मचाºयाचा मृत्यू झाल्याची घटना २३ रोजी रात्री घडली. पंकज गोपाळ चोपडे (वय ३५) असे त्यांचे नाव आहे. याआधी ते भुसावळ येथे चक्कर येवून कोसळले होते, नंतर जळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
न्हावी, ता.यावल, जि.जळगाव : लोकसभा निवडणुकीत कर्तव्यावर असताना कर्मचाºयाचा मृत्यू झाल्याची घटना २३ रोजी रात्री घडली. पंकज गोपाळ चोपडे (वय ३५) असे त्यांचे नाव आहे. याआधी ते भुसावळ येथे चक्कर येवून कोसळले होते, नंतर जळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
न्हावी येथील जे.टी.महाजन पॉलिटेक्निक कॉलेजचे कर्मचारी पंकज गोपाळ चोपडे यांची लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदानाच्या दिवशी २३ एप्रिलसाठी नियुक्ती करण्यात आली होती. इतर मतदान अधिकारी नंबर दोन (पीओ) अशी त्यांची नियुक्ती केली होती.
मतदानाचे साहित्य घेण्यासाठी ते २२ रोजी भुसावळ येथे आलेले होते. मतदानाचे आवश्यक साहित्य त्यांनी ताब्यात घेतलेही आणि क्षणातच चक्कर येवून ते खाली कोसळले. याच वेळी भुसावळ तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना तत्काळ भुसावळ पालिका रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात सांगण्यात आले. परंतु त्यांचे सावदा येथे डॉ.अतुल सरोदे यांच्याकडे औषधोपचार सुरू होते म्हणून रुग्णवाहिकेने त्यांना सावदा येथे नेण्यात आले. तेथून जळगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना २३ रोजी रात्री साडेदहाला त्यांचा मृत्यू झाला.
या वेळी चोपडे यांचे सहकारी असलेले जे.टी.महाजन पॉलिटेक्निक कॉलेजचे सागर इंगळे, मिलिंद भोगे व प्रकाश महाजन उपस्थित होते.
दरम्यान, याआधी पंकज चोपडे यांनी फैजपूरचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना लेखी अर्ज दिला होता. ‘माझी तब्येत नेहमी नाजूक असते. त्यामुळे नेमणूक रद्द करावी,’ असे अर्जात नमूद केले होते. परंतु आॅर्डर आल्याने तुम्हाला राखीव ड्युटी करावीच लागेल, असे प्रशासनाने सांगितले, असे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.
२४ रोजी यावल येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ.फिरोज तडवी यांनी शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला. दुपारी चार वाजेला त्यांच्यावर न्हावी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व आई-वडील असा परिवार आहे.