विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू, पाणी भरताना गमवला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 09:19 PM2019-07-02T21:19:32+5:302019-07-02T21:20:22+5:30
पारोळा : इलेक्ट्रिक मोटर लावत असताना शॉक लागून महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील श्रीराम चौक भागातील कोळीवाडा येथे ...
पारोळा : इलेक्ट्रिक मोटर लावत असताना शॉक लागून महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील श्रीराम चौक भागातील कोळीवाडा येथे २ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता घडली.
निर्मलाबाई गोरख भोई (वय ३८) या नगरपालिकेच्या सकाळी नळाला पाणी आल्याने पाणी भरण्यासाठी घरात इलेक्ट्रिक मोटर लावण्यासाठी गेल्या असता त्यांना विजेचा धक्का बसला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना नातेवाइकांनी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी योगेश साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत गोविंदा साहेबराव भोई यांनी पारोळा पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विनोद साळी करीत आहेत.
दरम्यान, त्यांचे कुटीर रुग्णालयात शवविच्छेदन डॉ. योगेश सांळुरवे व दीपक सोनार यांनी केले. पारोळा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, दोन मुले सासू, सासरे, जेठ, दीर असा परिवार आहे.
सोमवारी या भागातील महिलांनी नळांना २२ दिवसांपासून वेळेवर पाणी येत नसल्याने नगरपालिकेवर धडक मोर्चा नेला होता. आज पाणी आल्यानंतर ही घटना घडली.