प्रसुतीनंतर जोंधनखेडा येथील महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 01:00 PM2018-07-07T13:00:28+5:302018-07-07T13:00:48+5:30
मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार
नशिराबाद/जळगाव : गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर दुर्गा रवींद्र जाधव (वय-२६, रा़ जोंधनखेडा, ता़ मुक्ताईनगर) या विवाहितेचा तीन तासानंतर अचानक मृत्यू झाला़ ही घटना शुक्रवारी पहाटे ५ वाजता उघडकीस आली़ दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाला, असा आरोप करीत नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला़ मात्र, पोलिसांनी समजूत घातल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला व सायंकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले़
गुरूवारी रात्री दुर्गा यांना प्रसुतीसाठी कुटूंबीयांसह नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले होते़ मात्र, पुरेशी सुविधा आणि रक्तसाठा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुढील उपचारासाठी रात्रीच हलविण्यात आले़ त्यानंतर मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास दुर्गा यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला़ शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला़ ही माहिती मिळताच नातेवाईकांनी आक्रोश केला़
विवाहितेच्या शरीरात रक्ताचे कमी प्रमाण असल्यामुळे आम्ही रक्ताच्या बॉटल्स् उपलब्ध करून दिल्या होत्या़ परंतू, त्यांनी त्या वापरल्याच नाही, तसेच प्रसुतीनंतर आवश्यक ते उपचार न मिळाल्यामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला व संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्राही घेतला. या घटनेचे वृत्त कळताच यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल, नशिराबाद येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक आऱटी़धारबळे यांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांची समजूत घातली. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
या विवाहितेची प्रकृती गंभीर होती. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सर्पदंश व इतर घटनांचे रुग्ण जास्त असल्याने जागेअभावी महिलेला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण समजेल.
-डॉ. किरण पाटील, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा रुग्णालय.
प्रसूतीसाठी आलेल्या विवाहितेची अगोदरच स्थिती नाजूक होती. तिचा रक्तदाब वाढलेला होता. जिल्हा रुग्णालयातून पाठविण्यात आल्यानंतर आम्ही योग्य ते उपचार केले व रक्ताच्या दोन बाटल्याही देण्यात आल्या.
- डॉ. रुपेश पाटील, डॉ.उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय