जळगावात स्वाइन फ्लू सदृश आजाराने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:30 PM2017-09-16T12:30:50+5:302017-09-16T12:33:17+5:30
सुप्रीम कॉलनीत शोककळा : ऑक्सिजन रुग्णवाहिका अभावी धुळ्य़ाला हलविता आले नाही
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 16 - शहरातील सुप्रीम कॉलनी भागातील रहिवासी मनिषा विजय चव्हाण (25) या महिलेचा शुक्रवारी सकाळी स्वाईन फ्लू सदृश आजाराने मृत्यू झाला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
मनिषा चव्हाण या शहरातच राहत असलेले किशोर चव्हाण या त्यांच्या मामाकडे गुरुवारी गेल्या होत्या. तेथे अचानक झटके येऊ लागल्याने किशोर चव्हाण यांनी तिला रामेश्वर कॉलनीतील एका खाजगी दवाखान्यात नेले. तेथून दुसरीकडे नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात हलविले. तेथेही प्रकृती गंभीर झाल्याने जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. रात्री 12.50 वाजता जिल्हा रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अखेर शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता मृत्यू झाला.
खाजगी रुग्णालयातून या महिलेला हलविण्याचा सल्ला दिल्यानंतर धुळे अथवा औरंगाबाद येथे न्यायचे होते, मात्र ऑक्सिजन शिवाय या महिलेला नेणे शक्य नसल्याने ऑक्सिजनची सोय असलेली रुग्णवाहिका मिळू शकली नाही व तिला जिल्हा रुग्णालयातच ठेवावे लागले, असे किशोर चव्हाण यांनी सांगितले.
मनिषा चव्हाण हिचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात तिच्या नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. या वेळी महिलांना शोक अनावर झाला होता.
या बाबत मयत मनिषा चव्हाण यांच्या मामाने सांगितले की, खाजगी रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यात आले असून स्वाइन फ्लू असल्याचा त्यांना संशय आला व त्यांनी दुसरीकडे हलविण्याचा सल्ला दिला. मनिषाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचे तिच्या मामाचे म्हणणे आहे.
अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल - डॉ.पाटील
जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, सदर महिला गरोदर होती व त्या अवस्थेत तिचा रक्तदाब वाढला. स्वाइन फ्लू सदृश आजाराची तिला लागण झाली असावी, यासाठी खाजगी रुग्णालयात घेतलेले रक्ताचे नमुने व तिच्या घशातील थुंकीचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात येतील व त्याचा अहवाल आल्यानंतर स्वाइन फ्लू आहे की नाही, हे स्पष्ट होईल. मात्र स्वाइन फ्लू सदृश रुग्ण आल्यानंतर त्यास टॅमी फ्लू च्या गोळ्य़ा देणे सुरू करतो, असे डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले.