जळगावात कंपनीत काम करताना तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:53 PM2018-12-08T12:53:38+5:302018-12-08T12:54:29+5:30
जैन इरिगेशनकडून एक लाखाची मदत
जळगाव : शिरसोली रस्त्यावरील जैन उद्योग समूहाच्या कांदा निर्जलीकरण विभागातील गोपाल रामचंद्र पाटील (५०, रा. आयोध्यानगर) हे उंचावर काम करीत असताना तोल जाऊन ते खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल पाटील हे जैन उद्योग समूहाच्या कंपनीमध्ये मेंटनस विभागात वेल्डर म्हणून कामाला होते. शुक्रवारी दुपारी ते कांदा निर्जलीकरण विभागात इतर चार ते पाच कामगारांसह उंचावर काम करीत होते. त्यावेळी त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्या वेळी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात हलविले. तेथून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्यांना तेथे हलविले असता वैद्यकीय अधिकाºयांनी मयत घोषित केले. संध्याकाळी त्यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
गोपाल पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई असा परिवार आहे.
गोपाल पाटील यांना मुलगा नसून दोनही मुली असल्याने शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कारावेळी पाटील यांच्या पार्थिवास त्यांची लहान मुलगी अर्पिता हीने मुखाग्नी दिला. या वेळी उपस्थित सर्व जण हळहळले.
मृतदेह पाहताच शालकास आली भोवळ
गोपाल पाटील यांचे जावई मयूर महाजन हेदेखील जैन उद्योग समुहातच कामाला असून घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी इतरही नातेवाईकांना घटनेबाबत कळविले. त्या वेळी पाटील यांचे केºहाळे, ता. रावेर येथील शालक अनिल पाटील व इतर नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली. तेथे गोपाल पाटील यांचा मृतदेह पाहताच अनिल पाटील यांना भोवळ आली व ते खाली कोसळले. त्या वेळी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातच दाखल करून उपचार करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर गोपाल पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कंपनीकडून एक लाखाची मदत
मयत गोपाल पाटील यांच्या कुटुंबीयास तातडीची मदत म्हणून कंपनीच्यावतीने एक लाखाची मदत देण्यात आली, अशी माहिती कंपनीचे अधिकारी जी.आर पाटील यांनी दिली.