प्रेमविवाह केलेल्या तरुणीपाठोपाठ तरुणाचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 07:46 PM2021-01-02T19:46:15+5:302021-01-02T19:46:28+5:30
पाळधी येथील प्रकरण : तिघांना अटक
जळगाव : प्रेमविवाहानंतर मृत्यू झालेल्या तरुणीसोबतच तिचा प्रियकर तथा पती प्रशांत विजयसिंग पाटील (रा.पाळधी, ता.धरणगाव) याचाही शनिवारी सकाळी उपचारादरम्यान जळगावात मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे दोघं कुटुंबियांनी एकमेकावर आरोप केलेले आहेत. प्रियकराचे वडील विजयसिंग बाबुराव पाटील, त्याचा मित्र विकास धर्मा कोळी व विक्की उर्फ विजय संतोष बोरसे (रा.पाळधी, ता.धरणगाव) या तिघांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. या तिघांना 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत विजयसिंग पाटील व आरती विजय भोसले या दोघांनी प्रेमप्रकरणातून पलायन केले होते व नंतर प्रेमविवाह करुन परत आल्यावर दोनच दिवसात आरतीचा मृत्यू झाला. प्रशांत याच्या घरात ३१ डिसेंबर रोजी ही घटना घडली. प्रशांत याने या दिवशी मित्रांसोबत घरात पार्टी केली होती. त्यानंतर एका खोलीत आरती अधर्नग्न अवस्थेत तर प्रशांत दुसऱ्या खोलीत बेशुध्दावस्थेत आढळून आले होते. रुग्णालयात दाखल केल्यावर आरतीला डॉक्टरांनी मृत घोषीत केले होते. आरतीच्या बाबतीत घातपात इतर प्रकार झाल्याचा संशय तिच्या आई, वडीलांनी व्यक्त करुन तिच्या सासरचे व मित्रांना अटक होत नाही,तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी आरतीचे वडील विजय हरसिंग भोसले यांच्या फिर्यादीवरुन पती प्रशांत विजयसिंग पाटील, सासरे विजयसिंग बाबुराव पाटील, मित्र विकास धर्मा कोळी, विक्की उर्फ विजय संतोष कोळी व नणंद कविता सुनील पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. शनिवारी सकाळी वरील तिघांना अटक झाली. त्यानंतर प्रशांतच्याही मृत्यूची बातमी धडकली.
व्हीसेरा ठेवला राखीव
आरती व प्रशांत या दोघांचा मृत्यू विषारी द्रव्यामुळे झाल्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांना मिळाला असून नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी दोघांचाही व्हिसेरा राखीव ठेवण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी दिली. दरम्यान, मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त होत होता, मात्र तसा काहीच प्रकार नसल्याचेही शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालेले आहे. प्रशांतच्या कुटुंबाविरुध्द गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई झाली आहे, त्यामुळे आता आमचाही मुलगा मृत झाला असून आरतीच्या कुटुंबियावरुध्द गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई करावी, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा प्रशांतच्या बहिणीने व इतर कुटुंबियांनी घेतला होता. पोलिसांनी मध्यस्थाची भूमिका बजावत प्रशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले.