जळगावात मॅटेडोअरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 10:27 PM2018-07-29T22:27:30+5:302018-07-29T22:29:19+5:30
व्यवसायासाठी रेल्वे स्टेशनवर दुचाकीने जात असलेल्या मुजाहीद्दीन कुदबुद्दीन काझी (वय ३०, रा.पिरजादेवाडा, मेहरुण जळगाव) या तरुणाला भरधाव वेगाने जाणाऱ्या मॅटेडोअरने धडक दिली.
जळगाव : व्यवसायासाठी रेल्वे स्टेशनवर दुचाकीने जात असलेल्या मुजाहीद्दीन कुदबुद्दीन काझी (वय ३०, रा.पिरजादेवाडा, मेहरुण जळगाव) या तरुणाला भरधाव वेगाने जाणाऱ्या मॅटेडोअरने धडक दिली. त्यात मुजाहीद्दीन जागीच ठार झाला. मदत न मिळाल्याने या तरुणाचा मृतदेह तब्बल अर्धा तास जागेवरच पडून होता. हा अपघात रविवारी दुपारी चार वाजता नेरी नाका स्मशानभूमीनजीक पुलावर झाला.
मुजाहीद्दीन काझी हा तरुण रेल्वे गाड्यांमध्ये प्लास्टीकच्या वस्तू विक्री करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. रविवारी दुपारी चार वाजता अजिंठा चौकाकडून रेल्वे स्टेशन येथे दुचाकीने (क्र.एम.एच.०३ ए.सी.१५७) जात असताना नेरी नाका स्मशानभूमीनजीकच्या पुलावर मागून भरधाव वेगाने आलेल्या मॅटेडोअरने (क्र.एम.एच.१८ ई.७२८२) दुचाकीला मागून धडक दिली. त्यात मुजाहीद्दीन हा दुचाकीसह मॅटेडोअरच्या चाकाखाली आला. त्यात मुजाहीद्दीन याची कवटीच बाहेर आली. या दुर्घटनेत मुजाहीद्दीन जागीच गतप्राण झाला. या अपघातानंतर घाबरलेल्या चालकाने मॅटेडोअर जागेवरच सोडून पळ काढला.