आरक्षण मुद्यावरून सोशल मीडियावर वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:57 PM2020-07-25T12:57:15+5:302020-07-25T12:57:26+5:30
जळगाव : ‘धुळे महिला शक्ती’ या व्हॉट्स अॅप ग्रुपवर आरक्षणाच्या मुद्यावरून वाद उद्भवून त्यानंतर एका महिलेने वैयक्तिक संदेश पाठवून ...
जळगाव : ‘धुळे महिला शक्ती’ या व्हॉट्स अॅप ग्रुपवर आरक्षणाच्या मुद्यावरून वाद उद्भवून त्यानंतर एका महिलेने वैयक्तिक संदेश पाठवून आरक्षणाबाबत आक्षेपार्ह शब्दप्रयोग केल्याचा आरोप करीत संबंधित महिलेविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आह़े . शकीलाबानो रफीक तडवी यांनी ही तक्रार दिली असून गुन्हा दाखल व्हायला वेळ लागत असल्याने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करावी लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे़
निवेदना म्हटल्याप्रमाणे, १५ जुलै रोजी धुळे महिला शक्ती या व्हॉट्स अॅप ग्रुपवर आरक्षणाविषयी चर्चा सुरू झाली़ यात वाद उद्भवले़ यात मीना शर्मा-खंडेलवाल यांनी अनुसूचित जाती जमाती विरुद्ध शत्रूत्वाची व द्वेष भावना व्यक्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दमदाटीही केल्याचे म्हटले आहे.
आपण ग्रुप सोडला, मात्र, संबधित महिलेने वैयक्तिक संदेश पाठवून आरक्षणाची खैरात सोडलेले लोक दाखवा १ हजार रूपये मिळवा, आरक्षणाच्या बळावर नोकऱ्या मिळवायचा व प्रचंड भ्रष्टाचार करायचा, लाड लय झाले, संस्कार नाहीत, असे आक्षेपार्ह व्यक्तव्य केली आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत गेल्या आठ दिवसांपासून तक्रार देऊनही गुन्हा दाखल होत नसल्याने अखेर पोलीस अधीक्षकांना निवेदन द्यावे लागत असल्याचे शकिलाबानो तडवी यांनी निवेदनात म्हटले असून व्हॉट्स अॅप ग्रुपवरचे स्क्रीन शॉटही निवेदनाला जोडले आहेत़
मी एक नागरिक म्हणून याबाबतीत माझे साधं मत मांडले आहे़ आर्थिक निकषांवर आरक्षण मिळावे, यावरून ही चर्चा होती़ महिला सशक्ती करण्यासाठी हा गृप असून यात कोणत्याही जातीच्या किंवा धर्माच्या भावना दुखावल्या जात नाही. समोरील महिलाच मला अरेतुरे करीत होत्या़ आरक्षणावर माझे व्यक्तीगत मत होते़
- मीना शर्मा-खंडेलवाल
१५ जुलै रोजी व्हॉट्स अॅप ग्रुपवर आरक्षणाची चर्चा झाली़ मीना शर्मा या आरक्षण देणारे व अनुसूचित जाती जमातींबद्दल शत्रुत्वाच्या भावनेने बोलत होत्या़ शिवाय मी जे म्हणेल तीच चर्चा गु्रपवर होईल, ज्यांना आवडत नसेल त्यांनी निघून जावे असा दम भरत होत्या़ मी ग्रुप सोडला़ वाद संपला. मात्र, त्यांनी वैयक्तिक मोबाईलवर संदेश पाठवून ‘आरक्षण घेणोर भ्रष्टाचार करतात, तुम्हाला संस्कार नाहीत’, अशा शब्दात वाद घातले़ पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने अखेर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करावी लागली़
- शकीलाबाने तडवी, तक्रारदार