पातोंडा येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 05:09 PM2021-02-02T17:09:18+5:302021-02-02T17:11:40+5:30
नैराश्याने जीवन जगत असलेल्या एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पातोंडा, ता. अमळनेर : सततच्या नापिकीमुळे व डोक्यावर कर्जाचा बोजा अशा हताश झालेल्या व नैराश्याने जीवन जगत असलेल्या एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव शांताराम बळीराम पवार असे आहे.
आत्महत्याग्रस्त शांताराम बळीराम पवार यांचेकडे तीन बिघे शेती आहे. गेल्या तीन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींमुळे शेती नापीक होऊन उत्पादन आले नाही. डोक्यावर सोसायटीचे अर्ध्या लाखाच्यावर पीक कर्ज, बाहेरील व्याजाचे व हात उसनवारीचे पैसे असे दोन लाखाच्या आसपासचे कर्ज कसे फेडायचे व संसाराचा गाडा कसा हाकायचा, अशा चिंतेत ते होते, अशी माहिती त्यांचे लहान भाऊ रत्नाकर पवार यांनी दिली.
दि. १ फेब्रुवारी सोमवारी सकाळी ते शेतात गेले. घरी जाऊन येतो, असे सांगून परत शेतातून घरी आले. आपल्या राहत्या घरी दुपारी १२ ते १ वाजेच्या च्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत त्यांचे लहान भाऊ रत्नाकर पवार यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात खबर दिलीआहे. त्याचे पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, दोन बहिणी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.