तळेगावजवळ बिबटय़ा आढळला मृतावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 07:34 PM2017-10-26T19:34:05+5:302017-10-26T19:39:00+5:30
जामनेर तालुक्यातील तळेगाव- सावरला दरम्यान मयत अवस्थेत तरुण बिबटय़ा आढळल्याने ग्रामस्थांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.
लोकमत ऑनलाईन तळेगाव ता. जामनेर, दि.26 : तळेगाव ते सावरला ता. जामनेर दरम्यान जळान्द्री फाटय़ावर गुरूवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मयतावस्थेत एक बिबटय़ा आढळून आला आहे. या फाटय़ावरील देवश्री माध्यमिक विद्यालयाच्यामागे एका शेताआड निंबाच्या झाडाखाली हा बिबटय़ा आढळला. त्या झाडावर बिबटय़ाच्या पंजाची नखे लागलेली प्रथमदर्शी दिसून आले आहे. याबाबत माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक एस. आर. पाटील, वनक्षेत्रपाल व्ही. पी. पाटील, वनपाल यांच्यासह वन कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. नंतर मयत बिबटय़ाचे शव विच्छेदन करून त्याच ठिकाणी त्याला जाळण्यात आले. या घटनेची वार्ता परिसरात माहीत पडताच तळेगाव, सावरला, जळान्द्री आदी गावातील लोकांनी बिबटय़ाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान, परिसरात अजून बिबटय़ा असण्याची शक्यता शेतक:यांनी वर्तविली आहे. दरम्यान, बिबटय़ाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत वनक्षेत्रपाल पाटील यांनी सांगितले की, बिबटय़ाच्या अंगावर बाहेरून कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे कारण कळण्यासाठी व्हीसेरा नाशिक येथे प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असून तेथून अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण कळू शकणार असल्याचे त्यांनी नमूद केले.