लग्न जुळवून देणाऱ्या दलालाकडून नवरदेवाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:11 AM2021-07-05T04:11:56+5:302021-07-05T04:11:56+5:30
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथील रवींद्र प्रकाश पाटील (३२) या युवकाच्या लग्नासाठी मुलीचा ...
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथील रवींद्र प्रकाश पाटील (३२) या युवकाच्या लग्नासाठी मुलीचा शोध सुरू असताना समाजात मुलगीच मिळत नसल्याने रवींद्रची चुलत बहीण विद्या सुनील पाटील (पळसखेडा (गुजर) ता. जामनेर) हिनेदेखील प्रयत्न केले. मात्र मुली नसल्याने वैतागलेल्या रवींद्रने अन्य समाजाची मुलगी असली तरी चालेल, असा विचार करत असताना विद्या पाटील हिच्या शेजारी राहत असलेल्या राजेश्वर नारायण पाटील हा मुलींचा शोध घेऊन लग्न जुळवून देत असल्याचे समजले.
रवींद्रचे लग्न जुळवून देण्याचे राजेश्वर पाटील याने वचन दिले. त्यासाठी ३० हजार रुपये सुरुवातीस लागतील, अशी मागणी केली. रवींद्रने जामनेर बसस्थानकावर मित्रासोबत जाऊन राजेश्वर पाटील यास रोख ३० हजार रुपये दिले. मात्र ज्या मुलीचे स्थळ सुचविले, ती पळून गेल्याचे सांगत अन्य मुलीचा शोध घेण्याचे ठरले. राजेश्वर पाटील या दलालाने व्हॉट्सॲपवर ज्योती जयराम पाटील (पंढरपूर) या मुलीचा फोटो दाखवून लग्न निश्चित केले. त्यासाठी ७ जून रोजी दागिने घेण्यासाठी मुलीच्या वडिलांनी १ लाख १० हजारांची मागणी केली असून ती रक्कमदेखील रवींद्रने राजेश्वर पाटील यास ऑनलाइनने टाकली व स्वतःला १० हजार रोख घेतले.
लग्नाची तारीख २२ जून ठरली. इकडे दुसखेडा येथे २१ रोजी नातेवाईक मंडळी लग्नासाठी हजर होते. रवींद्रला हळद लावली. मात्र २२ रोजी वाट पाहूनदेखील नवरी मुलगी आली नाही. यावेळी राजेश्वर पाटील या दलालाचा मोबाईल बंद होता व तो फरार होता. यामुळे नवरदेवाची फसवणूक झाली. बोहल्यावर चढण्यापूर्वीच रवींद्रची हळद फिटली. दलाल राजेश्वर पाटील याने लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करीत दीड लाख रुपयात फसवणूक झाल्या प्रकरणी रवींद्र प्रकाश पाटील या नवरदेवाच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाने पो. हे. कॉ. प्रकाश पाटील करीत असून दलाल राजेश्वर पाटील यास ताब्यात घेण्यात आले आहे. राजेश्वर पाटील हा अमरावती जिल्ह्यातील असून दोन वर्षांपूर्वी तो वाडी शेवाळे (ता. पाचोरा) येथे काही वर्षे एकटाच राहत होता. आता तो पळासखेडे (ता. जामनेर) येथे एकटाच राहतो.