शहर व तालुकाध्यक्षपदाचा निर्णय जिल्हास्तरावरुन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 11:52 PM2019-12-22T23:52:11+5:302019-12-22T23:52:17+5:30

चाळीसगाव : दिवसभर बैठकीचे सत्र, १७ इच्छुकांमध्ये रस्सीखेच

The decision of the City and Taluka President from the district level | शहर व तालुकाध्यक्षपदाचा निर्णय जिल्हास्तरावरुन

शहर व तालुकाध्यक्षपदाचा निर्णय जिल्हास्तरावरुन

Next




चाळीसगाव : भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष निवडीची प्रक्रिया रविवारी भूषण मंगल कार्यालयात झाली. मात्र तब्बल सहा तासानंतरही इच्छुकांमधून कुणाच्याही निवडीवर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही.
या निवडी जिल्हास्तरावरुन जाहिर करण्यात येतील, असे निरीक्षक म्हणून उपस्थित असणा-या सदाशिव पाटील यांनी जाहिर केले. शहराध्यक्ष पदासाठी ११ तर तालुकाध्यक्ष पदासाठी सहा इच्छुकांमध्ये रस्सीखेच आहे.
शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला होता. त्यानुसार रविवारी दुपारी दोन वाजता निरीक्षक सदाशिव पाटील यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते.
निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आपली पदावर वर्णी लागण्यासाठी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र निवड प्रक्रियेत इच्छुकांपैकी कुणाच्याही नावावर एकमत होऊ शकले नाही. निवडीवर रात्री आठ वाजेपर्यंत खल सुरु होता. अखेरीस निरीक्षक सदाशिव पाटील यांनी इच्छुकांची नावे जिल्हास्तरावर दिले जातील. असे सांगितले. यानंतर बैठक संपली. जिल्हास्तरावरुन कुणाची निवड होते. याकडे आता भाजपातील इच्छुकांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष एकवटले आहे.
यावेळी जि.प.चे शिक्षण व अर्थ सभापती पोपट भोळे, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) डॉ. संजीव पाटील, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, पं.स.सभापती स्मितल बोरसे, पालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, बाजार समितीचे सभापती सरदारसिंग राजपूत, वसंतराव चंद्रात्रे, मच्छींद्र राठोड, किसनराव जोर्वेकर, विद्यमान तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.


१७ इच्छुकांमध्ये रस्सीखेच
शहराध्यक्ष पदासाठी एकुण ११ इच्छुक आहेत. यात प्रमुख इच्छुक नगरसेवक व विद्यमान शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, अ‍ॅड. प्रशांत पालवे, प्रभाकर चौधरी, योगेश खंडेलवाल यांच्यासह विवेक चौधरी, राजेंद्र पगार, अमोल नानकर, सोमसिंग पाटील आदींचाही समावेश आहे.
शहराच्या तुलनेत तालुकाध्यक्षपदासाठी इच्छुक अवघे सहा आहेत. यात प्रमुख इच्छुक कपिल पाटील, प्रा. सुनील निकम, माजी पं.स.सदस्य दिनेश बोरसे, यांच्यासह किसनराव जोर्वेकर, धनंजय मांडोळे, रवींद्र चुडामण पाटील, संजय पाटील, रमेश सोनवणे, डॉ. महेश राठोड, राजेंद्र पाटील आदींनी दावा केला आहे.

Web Title: The decision of the City and Taluka President from the district level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.