राहुरी कृषी विद्यापीठाचे विभाजन करून जळगावात कृषी विद्यापीठासाठी लवकरच निर्णय - मुख्यमंत्र्यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 08:52 PM2019-02-21T20:52:16+5:302019-02-21T20:52:33+5:30
केळी संशोधन केंद्राच्या निधीच्या मुद्द्याला मात्र बगल
जळगाव / भुसावळ : केळीचे माहेरघर असलेल्या जळगाव जिल्ह्यात कृषी विद्यापीठ उभारण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भुसावळ येथे दिली. यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाचे विभाजन करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. कृषी विद्यापीठाची घोषणा केली असली तरी जळगावसाठी मंजूर असलेल्या केळी संशोधन केंद्राच्या निधीच्या मागणीला मात्र मुख्यमंत्र्यांनी बगल दिला.
खासदार रक्षा खडसे यांच्या ‘समर्पण’ या कार्य वृत्तांताचे प्रकाशन करण्यासह निंभोरा, सावदा व नाडगाव-बोदवड या रेल्वे उड्डाणपुलाचे भूमीपूजन, भुसावळ येथील प्रशासकीय इमारतीचे व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यानाचे लोकार्पण व आमदार संजय सावकारे यांच्या स्थानिक विकास निधीतून तयार करण्यात आलेल्या उद्यानाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते गुरुवारी भुसावळ येथे झाले, त्या वेळी ते बोलत होते.
प्रास्ताविक आमदार संजय सावकारे यांनी केले. यामध्ये त्यांनी भुसावळ येथे होत असलेल्या कामांची माहिती देऊन विविध कामांसाठी निधी देण्यासह ट्रामा सेंटरसाठी मनुष्यबळ मिळणे व भुसावळातील औद्योगिक वसाहतीसाठी मोठे उद्योग येण्यासाठी मदत करावी, अशी मागणी केली. त्यानंतर वरील विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण रिमोटद्वारे करण्यात आले. या सोबतच आयुष्यमान भारत योजनेंतर्गत प्रातिनिधीक स्वरुपात पाच जणांना ‘गोल्ड कार्ड’चे वाटप करण्यात आले. साडेचार वर्षात केलेल्या कामांचा आढावा खासदार रक्षा खडसे यांनी मांडला.
‘मेगा रिचार्ज’साठी ६ हजार कोटी रुपयांचा डीपीआर
मेगा रिचार्ज प्रकल्पामुळे जळगाव जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असून यासाठी ६ हजार कोटी रुपयांचा डीपीआर केंद्राला सादर करण्यात आला असून तो लवकरात लवकर मंजूर होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. सोबतच एकनाथराव खडसे यांनी केलेल्या मागणीतील विविध महाविद्यालयांनाही मंजुरी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मंजूर कामांची यादी मांडत एकनाथराव खडसे यांनी मागितला निधी
या वेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी या पूर्वी (खडसे मंत्री असताना) मंजूर झालेल्या कामांना निधी देऊन ती कामे तत्काळ सुरू करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. यामध्ये कृषी विद्यापीठाच्या मागणीचा सर्वप्रथम उल्लेख करीत पशू वैद्यकीय महाविद्यालय, हॉर्टीकल्चर महाविद्यालय अशा विविध कामांची यादी मुख्यमंत्र्यांसमोर वाचत त्यासाठी निधी देण्याची मागणी केली. या सोबतच रेल्वेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहिमेंतर्ग विस्तापित झालेल्यांना घरे देण्याची मागणी केली. जळगावसाठी केळी संशोधन केंद्र मंजूर असून त्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी खडसे यांनी या वेळी केली. मात्र या मागणीला मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात बगल दिला.
या वेळी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते.