लोकनियुक्त सरपंचाचा आज मतदानातून फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:35 AM2021-09-02T04:35:03+5:302021-09-02T04:35:03+5:30
जामनेर : मालदाभाडी (ता. जामनेर) येथील लोकनियुक्त सरपंच रंगनाथ पाटील यांच्यावर अविश्वास दाखल झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बुधवारी ग्रामसभा ...
जामनेर : मालदाभाडी (ता. जामनेर) येथील लोकनियुक्त सरपंच रंगनाथ पाटील यांच्यावर अविश्वास दाखल झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बुधवारी ग्रामसभा होणार आहे. ग्रामसभेत मतदानातून सरपंचाचे भवितव्य ठरणार आहे.
१० सदस्य असलेल्या मालदाभाडी ग्रामपंचायतीत निवडून आलेले सरपंच व सदस्य एकाच राजकीय पक्षाचे आहे. दोन, अडीच वर्षे सोबत राहून काम केल्यानंतर नऊ सदस्यांनी सरपंचावर अविश्वास दाखल केला. गावातील मतदारांनी निवडले असल्याने सदस्यांना अविश्वास दाखल करण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका सरपंचांनी घेतल्याने प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले. याबाबत ग्रामसभेने निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने दिल्याने आता त्या सरपंचाचे भवितव्य ग्रामसभेत उपस्थित राहणाऱ्या मतदारांच्या हातात आहे. १ सप्टेंबरला होणाऱ्या ग्रामसभेत छापलेल्या मतपत्रिकेद्वारे मतदान होईल.
मतदानासाठी महसूल विभागाने ३ बुथ केले असून, १ हजार २८२ मतदार मतदान करतील, अशी माहिती तहसीलदार अरुण शेवाळे यांनी दिली. मतदानाबाबत ग्रामस्थांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.
सदस्यांनी सरपंचांना एकटे पाडले
मालदाभाडी ग्रामपंचायतीवर भाजपचे बहुमत होते. अडीच वर्षे सामोपचाराने गाव कारभार सांभाळणाऱ्यांमध्ये अचानक मिठाचा खडा पडल्याने अविश्वासाची खेळी खेळली गेली. या धुसफुसीचा फायदा घेण्यासाठी भाजप विरोधकांनी मोट बांधल्याचे समजते.