मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीने निषेधाविषयी आज निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:17 AM2021-04-08T04:17:02+5:302021-04-08T04:17:02+5:30
जळगाव : मिनी लाॅकडाऊनच्या नावाखाली सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने व्यापारी वर्गात नाराजी असून, बुधवारी जळगावात दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात ...
जळगाव : मिनी लाॅकडाऊनच्या नावाखाली सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने व्यापारी वर्गात नाराजी असून, बुधवारी जळगावात दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आले. मात्र, आज, गुरुवापर्यंतची मुदत दिली असल्याने काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागलेले आहे. त्यात आज, गुरुवारी व्यापाऱ्यांकडून काळे झेंडे दाखवून निषेध करण्याच्या सूचना आहेत; मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बुधवारी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविल्याने आंदोलनाविषयी आज, गुरुवारी अंतिम निर्णय होणार आहे.
लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी पसरली असून, आज गुरुवारी काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा निर्णय फाम संघटनेने घेतला होता व तशा सूचनाही व्यापाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार जळगावातही या आंदोलनाविषयी विचारविनिमय सुरू आहे. मात्र, त्यापूर्वी बुधवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी व्यापाऱ्यांची चर्चा होऊन त्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे गुरुवारी यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, व्यापाऱ्यांचे प्रश्न खरोखर योग्य असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले असून, त्यावर सकारात्मक निर्णय होऊ शकतो, अशी अपेक्षा आहे, असे फामचे राज्य उपाध्यक्ष ललित बरडिया यांनी सांगितले.