मला त्रास देणाऱ्यांचा निर्णय जनतेच्या कोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:17 AM2021-09-26T04:17:58+5:302021-09-26T04:17:58+5:30
जळगाव : भाजप सरकारच्या काळात माझ्याविरुद्ध खोटे आरोप होऊन मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. मुळात महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणात ...
जळगाव : भाजप सरकारच्या काळात माझ्याविरुद्ध खोटे आरोप होऊन मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. मुळात महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणात कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम झालेले नव्हते. म्हणूनच न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. माझ्या विरोधात ज्यांनी चुकीचे आरोप केले, त्यांच्या बाबतीत नियती बघेलच. मी सर्व निर्मिकावर सोडून दिले. ज्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले, मला विनाकारण त्रास दिला, त्यांचा निर्णय जनतेच्या कोर्टात होईल, असे मत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी जळगावात व्यक्त केले.
जळगाव येथे शनिवारी ओबीसी आरक्षण हक्क परिषद झाली. या परिषदेच्या निमित्ताने मंत्री छगन भुजबळ जळगावात आले होते. ओबीसी परिषदेला हजेरी लावण्यापूर्वी अजिंठा शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी बोलताना वरील मत व्यक्त केले.
कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम नाही
महाराष्ट्र सदन किंवा आरटीओ कार्यालयाचे बांधकाम असो, त्यात कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम झालेले नव्हते. मात्र, आपल्याला नाहक अडकविण्यात आले. भाजपचे सरकार असताना माझ्याविरोधात जे दोषारोप न्यायालयात सादर करण्यात आले, त्यावर निकाल देताना न्यायालयाने कोणत्याही प्रकारचा दोषारोप सिद्ध होत नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. न्यायालयाने दिलेला निर्णय निश्चितच माझ्यासाठी आनंददायी आहे. या निर्णयाने समर्थकदेखील आनंदी आहेत, असेही भुजबळ म्हणाले.
...म्हणून मला मंत्रिमंडळात वरचा क्रमांक
अडचणीच्या काळात माझ्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अध्यक्ष शरद पवार हे खंबीरपणे उभे राहिले. मी निर्दोष आहे, असा त्यांना विश्वास होता म्हणूनच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर पहिल्याच मंत्रिमंडळात मला वरचा क्रमांक मिळाला. आता न्यायालयाचा निर्णय आला. आता यापुढे माझ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस, ओबीसी आणि सर्वसामान्य जनतेचे काम आहे. माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यांच्या बाबतीत नियती बघेल. जनतेच्या कोर्टात त्यांचा निर्णय होईल, असेही भुजबळ म्हणाले.