राजकीय वारसदारांची निर्णायक लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 01:11 PM2019-07-14T13:11:54+5:302019-07-14T13:12:35+5:30

भरत गावीत यांच्यानंतर पुढचा क्रमांक कुणाचा? मातब्बर राजकीय घराण्यांमध्ये अस्वस्थता, भाजपचा मार्गदेखील सुकर नाहीच ; आयारामांच्या वाढत्या आक्रमणाने निष्ठावंतांचा कोंडमारा

The decisive battle of the political heir | राजकीय वारसदारांची निर्णायक लढाई

राजकीय वारसदारांची निर्णायक लढाई

Next

मिलिंद कुलकर्णी
लोकसभा निवडणुकीत भाजपचा सलग दुसऱ्यांदा विजय झाल्याने देशातील राजकीय वातावरणात बदल झाला आहे. या विजयानंतर गोवा आणि कर्नाटकात भाजपने आक्रमक शैली आणि साम, दाम, दंड, भेद नीतीचा अवलंब करीत काँग्रेसला जेरीस आणले आहे. याचा परिणाम महाराष्टÑात होणे अपेक्षित आहे. काँग्रेस आणि राष्टÑवादी नेत्यांच्या वारसदारांच्यादृष्टीने विधानसभा निवडणूक निर्णायक लढाई ठरणार आहे. एकतर भाजपशी जुळवून घ्यायचे किंवा संघर्ष करीत अस्तित्व पणाला लावायचे हे दोन पर्याय त्यांच्यापुढे आहे. भरत गावीत यांनी पहिला पर्याय निवडला आहे.
खान्देशमधील जळगाव हा जिल्हा भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. जिल्हा परिषद, जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ, महापालिकांसह अन्य पालिका, पंचायत समिती आता भाजपच्या ताब्यात आहेत. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात ही स्थिती नाही. नंदुरबारमध्ये दोन आमदार, शहादा व तळोदा या पालिका भाजपच्या ताब्यात असल्या तरी नंदुरबारला पाच वर्षांत मंत्रिपद मिळालेले नाही. दोन्ही आमदार मूळ भाजपचे नाहीत. उदेसिंग पाडवी यांनी पूर्वी एकदा भाजपला ‘जय श्रीराम’ केलेला आहेच. शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील हे मूळ काँग्रेसी आहेत. डॉ.विजयकुमार व डॉ.हीना गावीत हे राष्टÑवादीतून भाजपमध्ये आलेले आहेत. दिलवरसिंग पाडवी, कुवरसिंग वळवी, डॉ.नरेंद्र पाडवी, डॉ.सुहास नटावदकर, डॉ.कांतीलाल टाटीया अशा मोजक्या नेत्यांभोवती भाजप घुटमळत होता. पक्षाचा पाया विस्तारण्यासाठी ‘आयाराम’ ही गरज बनली आणि आता नवापूर आणि धडगाव या दोन मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.
धुळे जिल्ह्यात तुलनेने वातावरण चांगले राहिले. त्याला कारण ज्येष्ठ नेते उत्तमराव पाटील यांच्यासारखे कणखर नेतृत्व या जिल्ह्याला लाभले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला अधून मधून यश मिळत गेले. उत्तमरावांच्या नंतर गोविंदराव चौधरी हे मंत्री बनले होते. परंतु, नंतर पक्षात नेतृत्व उभे राहिले नाही. जयकुमार रावळ, डॉ.सुभाष भामरे या दोघांची पार्श्वभूमी मूळ काँग्रेसी आहे. परंतु, आता ते भाजपमध्ये स्थिरावले आहेत. दोंडाईचा, साक्री, धुळे पालिकांमध्ये भाजपने यश मिळविले. शिरपूर आणि साक्री या मतदारसंघात यशासाठी आता भाजप प्रयत्नशील राहील.
कुणाल पाटील, मनोहर भदाणे, राजेंद्रकुमार गावीत, शरद गावीत, नागेश पाडवी, ललित कोल्हे, राजीव देशमुख, शिरीष चौधरी, किशोर पाटील, दिलीप वाघ, शिरीष मधुकरराव चौधरी या राजकीय वारसदारांच्यादृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. काही विद्यमान तर काही माजी आमदार आहेत तर काहींनी निवडणूक लढविलेली आहे.
काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांच्यादृष्टीने ही कसोटीची वेळ आहे. तरुणाई भाजपकडे झुकताना दिसत असताना या दोन्ही पक्षांचे राष्टÑीय व राज्य नेतृत्व मात्र तरुणाईची भाषा बोलताना दिसत नाही. पारंपरिक राजकारणाला फाटा देत भाजपने संघटनात्मक बांधणी मजबूत करुन निवडणुका जिंकल्या असताना दोन्ही काँग्रेसची संघटनात्मक स्थिती डळमळीत आहे. प्रभारी नेत्यांपासून तर जिल्हाध्यक्षांपर्यंत सर्वसमावेशकता, आक्रमक वृत्ती, संघटन कौशल्य या गुणांची आवश्यकता असताना कोठेतरी अपूर्णता जाणवत आहे. भाजपची हवा असेल तर त्याला खंबीरपणे तोंड देणारे नेतृत्व उभे ठाकल्यास कार्यकर्ते टिकून राहतील, हे निश्चित.
सलग दुसऱ्यांदा यशामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विरोधी पक्षात काम करीत असताना केलेला संघर्ष, दाखविलेल्या संयमाचे चिज झाले अशीच त्यांची भावना आहे. सत्तेची फळे आता मिळतील, असे वाटत असताना काँग्रेसमधील मंडळी दाखल होऊ लागली असून त्यांच्यासाठी पायघड्या पसरल्या जात असल्याने निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता आहे. डॉ.सुहास नटावदकर हे त्यापैकी एक उदाहरण आहे. दुर्लक्षित झालेले असे अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांची नाराजी स्फोटक ठरु शकते.

Web Title: The decisive battle of the political heir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.