जळगावला युवकाच्या अपघाती मृत्यूप्रकरणी पोलीस स्टेशन आवारात घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 01:35 PM2018-05-31T13:35:20+5:302018-05-31T13:35:20+5:30
कार चालकाविरूध्द गुन्हा दाखल
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ३१ - शहरातील शिवतीर्थ मैदानाजवळ मंगळवारी रात्री भरधाव चारचाकी चालक नितीन विलास शिंदे याने सायकलस्वार गजानन गाडेकर (वय-२९ रा.रांजणी, ता़ जामनेर) या तरुणाला उडविले होते. रुग्णालयात दाखल करताना त्याचा मृत्यू झाला होता. बुधवारी पहाटेच्या सुमारास त्याचे कुटुंबीय आणि मित्र परिवार जळगावात पोहचल परंतु पोलिसांकडून कोणतेही सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप करीत त्यांनी सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात घोषणाबाजी केली.
रात्री अपघातानंतर कारचालका हा घटनास्थळावरून फरार झाला होता़ त्या दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरील अपघातग्रस्त कार व सायकल ताब्यात घेतली
बुधवारी सकाळी कारचालक हा पोलिसात हजर झाला़ त्यास अटक करून जिल्हापेठ पोलिसांनी वैद्यकिय तपासणी करण्यात आली़
त्यानंतर घडलेल्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली़ दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी गजाननच्या कुटूंबियांशी संपर्क साधत त्यांना जळगावी बोलविले होते. पहाटे २़३० वाजेच्या सुमारास ते शहरात आल्यानंतर मयत गजाननचे भाऊ गोपाल यांनी फिर्याद दिल्यावरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नातेवाईक, मित्रांचा सकाळी संताप
बुधवारी सकाळी ७ वाजता गजाननचे भाऊ गोपाळ व इतर नातेवाईक व आप्तेष्ट जिल्हा रूग्णालयात मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेले असता पोलीस पंचनामा झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात देता येणार नाही असे रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले़ त्याबाबत जिल्हापेठ पोलिसात कळविण्यास आले असता साहेब, आलेले नसल्याने काही वेळाने या असे त्यांना उत्तर देण्यात आले. त्यामुळे नातेवाईक आणि मित्रांचा चांगलाच संताप झाला. संतप्त जमावाने पोलीस अधिक्षक कार्यालयावर येवून निषेध व्यक्त करीत घोषणाबाजी केली. पोलिसांनी मध्यस्थी करून जमावाला शांत करीत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पाठविले.