कोरोनात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:17 AM2021-05-13T04:17:17+5:302021-05-13T04:17:17+5:30
मुक्ताईनगर : कोरोनामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतमालाला भाव नाही, केंद्र सरकारचे पॅकेज वगळता राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत ...
मुक्ताईनगर : कोरोनामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतमालाला भाव नाही, केंद्र सरकारचे पॅकेज वगळता राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत नाही, जिल्हाबंदीमुळे वाहतूक बंद आहे, यामुळे शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आलेली आहे. यात शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, असे पत्र भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठविले आहे.
या पत्रात खासदार खडसे यांनी म्हटले आहे की, अवकाळी पाऊस आणि वादळांसारख्या आपत्तींमुळे शेती उत्पादनाचे प्रचंड नुकसान होत आहे. वीजबिल माफी योजनेचा घोळ अजून संपलेला नाही. शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलात ३३ टक्के सवलत देण्याची राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केलेली घोषणा अजूनही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेली नाही. दुष्काळी मदत आणि पीकविम्याच्या योजना शेतकऱ्यांपासून लांबच आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे कोणतेही नियोजन राज्य सरकारने या काळात केलेले नाही.
शेतकऱ्यांसोबतच शेतमजूर, बारा बलुतेदार, वाजंत्रीवाले आणि हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यास मदत करण्यासाठीही आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
खासदार खडसे यांच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मागील वर्षी खासदार खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी भाजपतून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे, हे विशेष.