खान्देशात दुष्काळ जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:21 AM2021-08-14T04:21:22+5:302021-08-14T04:21:22+5:30
अमळनेर : खान्देशात यंदा वार्षिक सरासरीच्या २५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे पिकांची आशा जवळपास संपली आहे. त्यामुळे ...
अमळनेर : खान्देशात यंदा वार्षिक सरासरीच्या २५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे पिकांची आशा जवळपास संपली आहे. त्यामुळे जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
आमदार पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, केवळ माझा अमळनेर मतदारसंघच नव्हे, खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांच्या वतीने दुष्काळामुळे पीडित झालेल्या माझ्या शेतकरी बांधवांच्या व्यथा आहेत. बळिराजा खूपच खचला आहे. एकवेळा काय दुबार काय आणि तिबार काय पेरणीचे सारेच प्रयत्न फोल ठरले असून, पिकांची आशा तर जवळपास संपलीच आहे, शेतकऱ्यांनी आता आशा सोडली आहे, आता पुढे काय? हा एकच प्रश्न प्रत्येकासमोर असून, अशा कठीण परिस्थितीत आपले महाविकास आघाडी सरकार आपल्या पाठीशी ठाम उभे राहील ही आस साऱ्या शेतकरी बांधवांना आहे.
खान्देशातील गावोगावी गुरांसाठी चारा छावण्या सुरू करा, याव्यतिरिक्त जे जे करण्याजोगे असेल ते ते करा, अशी विनवणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
चौकट -
अतिवृष्टीमुळे पीडित झालेले ३२ खेड्यांतील शेतकरी अनुदानापासून अजूनही वंचित असल्याने आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे हा प्रश्नदेखील काळजीपूर्वक मांडून त्वरित संबंधित गावांना प्रलंबित अनुदान वितरित करावे अशी विनंती केली.