जनता कर्फ्यूमुळे शहरातील रुग्णसंख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:15 AM2021-03-20T04:15:30+5:302021-03-20T04:15:30+5:30
जळगाव : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूमुळे बाजारपेठ बंद राहून गर्दी न झाल्याने ...
जळगाव : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूमुळे बाजारपेठ बंद राहून गर्दी न झाल्याने संसर्ग कमी होण्यास मदत मिळाली. यामुळे जळगाव शहरातील साडेचारशेच्या पुढे गेलेली रुग्णसंख्या कमी होऊन दोनशे ते अडीचशेच्या जवळपास आली आहे.
शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जळगाव महापालिका क्षेत्रात १२ ते १४ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला. अत्यावश्यक सेवेत दवाखाने व मेडिकल्स, शासकीय कार्यालये ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह, दूध विक्री केंद्र तसेच कृषी क्षेत्रातील आस्थापना, गॅरेज अशा बाबींना या जनता कर्फ्यूत केवळ सूट देण्यात आली. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या बाबींना प्रशासनाकडून सूट नव्हती. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट राहिला.
वाढती रुग्णसंख्या आली खाली
जनता कर्फ्यू पूर्वी शहरात तीनशे ते पावणेचारशे रुग्ण संख्या समोर येत होती. त्यामुळे अधिकच चिंता वाढली. मात्र जनता कर्फ्यू नंतर ही संख्या कमी झालेली दिसून येते. जनता कर्फ्यू सुरू झाला त्यानंतरच्या अहवालांची तपासणी होऊन अहवाल समोर आले असता ही रुग्ण संख्या कमी झालेली आहे. यात जनता कर्फ्यूच्या एक दिवस अगोदर ११ मार्च रोजी जळगाव शहरात ३१० रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर १२ मार्च रोजी ३६३ रुग्ण समोर आले. ही संख्या वाढत जाऊन १५ मार्चपर्यंत ४३० रुग्ण समोर आले. मात्र जनता कर्फ्यू काळातील नमुन्यांचे अहवाल समोर येऊ लागले त्यावेळी ही संख्या कमी होत गेली. यात १६ मार्च रोजी ३४१ समोर आले तर १७ रोजी २१७ व १८ रोजी २६४ रुग्ण समोर आले. जनता कर्फ्यूच्या तीन दिवसाच्या काळात ही संख्या सध्याच्या संख्येपेक्षा जास्त दिसत असली तरी त्यात अगोदरच्या अहवालांचा समावेश होता.