शहरातील रुग्ण संख्येत घट मात्र मृत्यू थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:17 AM2021-05-08T04:17:11+5:302021-05-08T04:17:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात नवीन कोरोना रुग्णांची संख्या घटत असली तरी मृत्यू मात्र थांबत नसल्याचे चित्र आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात नवीन कोरोना रुग्णांची संख्या घटत असली तरी मृत्यू मात्र थांबत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी १२७ नवे रुग्ण आढळून आले असून ४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. बाधितांच्या मृत्यूची संख्या ५१६ वर पोहोचली आहे. तर १२० रुग्ण कोरोनामुक्तही झाले आहेत.
कोरोनाचा आलेख ओसरत असल्याचे चित्र शहरात आहे. गेल्या महिनाभरापासून रुग्णसंख्या ही १५० पेक्षा खाली आहे. सरासरी १२० रुग्ण रोज आढळून येत आहेत. मात्र, हेच प्रमाण मध्यंतरी ३०० रुग्ण प्रतिदिवसांवर गेले होते. मात्र, शहरातील मृत्यू वाढले आहे. जिल्ह्यातील मृतांमध्ये शहरातील मृत्यू अधिक होत आहेत. त्यामुळे प्रशासनासमोर हे एक मोठे आव्हान आहे. शुक्रवारी शहरातील ६४, ७० व ७५ वर्षीय पुरूष व ६५ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. यासह अमळनेर ३, जामनेर २ आणि पाचोरा, रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, जळगाव ग्रामीण या भागात प्रत्येकी १ बाधिताचा मृत्यू झाला आहे.
शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या घटत आहे. ग्रामीणमध्येही ही संख्या ३९२ वर आली आहे. जळगाव ग्रामीणमध्ये शुक्रवारी ३२ बाधित आढळून आले असून २० जण बरेही झाले आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या भुसावळ व जामनेरात वाढताना दिसत आहे. मुक्ताईनगरातही काहीशी रुग्णवाढ समोर येत आहे.
अशा झाल्या चाचण्या
ॲन्टीजन ५४५०, बाधित ४८४
आरटीपीसीआर : ३१२०, बाधित ३७७
आरटीपीसीआरचे पाठविलेले अहवाल : २०९४
रुग्णांची स्थिती
लक्षणे असलेले २४५०
ऑक्सिजनवरील रुग्ण १२३८
आयसीयूतील रुग्ण ७४५