समर्पण हेच जळगाव पोलिस दलाच्या यशाचे गमक; एम. राजकुमार यांनी निरोप समारंभात व्यक्त केल्या भावना
By विजय.सैतवाल | Published: February 4, 2024 10:54 PM2024-02-04T22:54:17+5:302024-02-04T22:54:26+5:30
पदोन्नतीने बदली झालेले एम. राजकुमार यांना रविवार, ४ फेब्रवारी रोजी संध्याकाळी निरोप देण्यात आला तर नूतन पोलिस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांचा स्वागत समारंभ रविवार, ४ फेब्रुवारी रोजी मंगलम सभागृहात झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोणत्याही घडामोडी, प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी येथे सदैव तत्पर राहणारे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांची समर्पण भावना हेच येथील पोलिस दलाच्या यशाचे गमक आहे. यातूनच जिल्ह्यात एमपीडीए सारख्या कारवाया मोठ्या प्रमाणात होऊ शकल्या व दंगली सारख्या प्रसंगांना वेळीच नियंत्रणात आणाता आले, अशा भावना मावळते पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी व्यक्त केल्या.
पदोन्नतीने बदली झालेले एम. राजकुमार यांना रविवार, ४ फेब्रवारी रोजी संध्याकाळी निरोप देण्यात आला तर नूतन पोलिस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांचा स्वागत समारंभ रविवार, ४ फेब्रुवारी रोजी मंगलम सभागृहात झाला. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर या दोन्ही अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते (जळगाव), कविता नेरकर (चाळीसगाव), एम. राजकुमार यांच्या पत्नी रम्या कन्नन उपस्थित होते.
या वेळी एम. राजकुमार म्हणाले की, जळगावातून जाताना मी मोठा अनुभव घेऊन जात आहे. येथील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मी जे काही काम केले त्याला येथील अधिकरी, कर्मचाऱ्यांनी एकदिलाने साथ दिली. इतकेच नव्हे सर्व अंमलदार माझ्या सोबत राहीले, हे अधिकारी, अंमलदारच माझी खरी ताकद आहे. त्यांच्यासह महसूल विभागाच्या सहकार्याने आपण जळगावात एमपीडीए सारख्या मोठ्या व त्याही अधिक संख्येने कारवाया करू शकल्याच्या भावना त्यांन व्यक्त केल्या. मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांचेही मला मोठे सहकार्य लाभले, असे त्यांनी नमूद करीत १५ महिन्याच्या काळात येथून १५ वर्षाचे प्रेम घेऊन जात असल्याचे ते म्हणाले. या वेळी एम. राजकुमार भावनिक झाले होते.
सर्वांच्या सहकार्याने अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न
पोलिस अधीक्षक म्हणून पदभार घेतला असून आता पोलिस दलातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कायदा व सुव्यवस्थेविषयीच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर आपला भर राहणार असल्याचे एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी नमूद केले. एम. राजकुमार यांचे व माझे काम या पूर्वीच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जवळपास सारखे राहिले असून आताही जळगावातून त्यांच्याकडून पदभार घेतला आहे. त्यांनी येथे जे काम केले त्याची प्रेरणा घेऊन आपणही काम करू व जळगावचे नाव उंचावणार असल्याचे ते म्हणाले. येथे आलेले या पूर्वीचे अधिकारी पदोन्नती होऊन येथून गेले आहे, आपलीही जळगावातून पदोन्नती होवो अशी अपेक्षा बाळगतो, असेही ते गमतीने म्हणाले.
पोटाला आत घेत मनाला मोठे करत काम करा
पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आपल्या कामाच्या पद्धतीने अनेकांना प्रेरणा दिली असून त्यांच्या मोठ्या मनाचे कौतूकही केले पाहिजे, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले. फिटनेसविषयीचे किस्से सांगताना जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक उदाहरणे देत एम. राजकुमार यांचे पोट कधी पुढे दिसणार नाही, मात्र त्यांचे मन मोठे असून सर्वांनी आपले पोट मध्ये घेत व मन मोठे करत काम करावे, असे आवाहन केले. गेल्या काही दिवसात दंगलीच्या ज्या घटना घडल्या त्या ठिकाणी केवळ सात मिनिटात पोलिस पोहचले ही देशातील पहिलीच वेळ असेल, असे सांगत त्यांनी पोलिस दलाचे कौतुक केले. या वेळी अशोक नखाते, कविता नेरकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी, अन्य कर्मचाऱ्यांसह शहरातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमास माजी महापौर जयश्री महाजन, जि.प.चे माजी सदस्य प्रताप पाटील यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोउनि रेश्मा अवतारे यांनी केले.