शिरसोली येथील खोल रस्ते ठरताहेत अपघाताचे कारण; रस्त्यांना उतार देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:11 AM2020-12-27T04:11:57+5:302020-12-27T04:11:57+5:30
शिरसोली प्र नं. : येथील मुख्य चौकातील रस्ते खोल गेल्याने समोरचे वाहन दिसत नसल्याने ग्रामपंचायतीजवळ रोजच लहान-मोठे अपघात होत ...
शिरसोली प्र नं. : येथील मुख्य चौकातील रस्ते खोल गेल्याने समोरचे वाहन दिसत नसल्याने ग्रामपंचायतीजवळ रोजच लहान-मोठे अपघात होत आहेत. तरी महामार्ग ठेकेदाराने या ठिकाणी रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्त्याला मोठ्या प्रमाणात उतार द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ वर्गातून केली जात आहे.
शिरसोली प्र.नं. गावात ग्रामपंचायतीसमोर जळगाव चांदवड महामार्ग रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. या रस्त्याची उंची बऱ्यापैकी वाढल्याने गांवातील मुख्य रस्ते हे अतिशय खोल गेले आहेत. या खोल गेलेल्या रस्त्यावर वाहनधारकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते. अनेक वेळा वाहने समोरासमोर येऊन अपघात होत असतात. रस्ता खोल असल्याने अवजड मालाने भरलेल्या वाहनांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या ठिकाणी मालाने भरलेली वाहने अनेक वेळा पलटीही झालेली आहेत, तसेच येथील गटारांवर झाकणे बसविण्याचे कामही बाकी आहे. यामुळे येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी ठेकेदाराने गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यांना उतार देऊन रुंदीकरण करून गटारे पॅक करावीत, अशी मागणी ग्रामस्थवर्गातून केली जात आहे.
--------------------
गतिरोधक बसविण्याची मागणी
जळगाव-चांदवड रस्त्याचे काम बऱ्यापैकी झाले असून, या रस्त्याने वाहने सुसाट वेगात धावत असतात; परंतु शिरसोली प्र. न. ग्रामपंचायतीजवळ एकाच ठिकाणी मुख्य शिरसोली गाव, चिंचपुरा रस्ता, ग्रामपंचायत कार्यालय, एस टी. स्टँड व रस्त्यांना उतार व वळण असल्याने हे ठिकाण अपघाताला निमंत्रण ठरत आहे. तरी या चौकात गतिरोधक बसविण्याची मागणी केली जात आहे.