नद्यांना पूर येताच वाळू तस्करांची दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:19 AM2018-08-21T00:19:25+5:302018-08-21T00:23:20+5:30
रावेर तालुक्यातील केºहाळे - मंगरूळ या दहा किलोमीटरच्या अंतरात असलेल्या भोकर नदीच्या पात्रातून वाळू तस्करांकडून दिवसाढवळ्या वाळूची सर्रास लूट सुरू आहे. गेल्या आठवड्यात सातपुड्यात झालेल्या पावसामुळे नद्यांना पूर आले. त्यामुळे वाळूचा स्तर वरती आल्याने आयती संधी वाळू चोरट्यांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
केºहाळे ता. रावेर, जि. जळगाव : संपलेल्या आठवड्यात सातपुडा पर्वत रांगेत झालेल्या मुसळधार वृष्टीमुळे तालुक्यातील मंगरूळ ते केºहाळे या भागातील भोकर नदीला आलेल्या पुरामुळे वाळूचा स्तर पालटल्याने ती नदीपात्रात वर आली आहे, त्यामुळे वाळू चोरट्यांनी येथे अक्षरश: धुमाकूळ घातला असून जमिनीत पाणी मुरवण्यासाठी शेतकºयांनी केलेला हजारो रुपयांचा खर्च पाण्यात जाणार आहे. याकडे मात्र संबंधीतांचे दूर्लक्ष होत असल्याने शेतकºयांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील मंगरूळ ते केºहाळे या भागातून भोकर नदी वाहते. सद्या या नदीला बºयापैकी पाणी आले आहे. त्यामुळे नदीचा स्तर पालटला असून वाळू वर आली आहे. तथापि आठ ते दहा किलोमीटर अंतराच्या नदी पात्रातून आयती वर आलेली वाळू पळविण्यासाठी वाळू चोरटे सक्रीय झाले आहेत. दिवसाढवळ्या वाळूची लूट केली जात असल्याने संतप्त शेतकरी प्रांत किंवा तहसील कार्यालयात धडक देण्याच्या पवित्र्यात आहेत.
वरूणाची कृपा पण...
गेल्या आठवड्यात वरूण राजाच्या कृपेमुळे सातपुडा पर्वत रांगेत दमदार पाऊस झाल्यामुळे भोकर नदीवरील मंगरूळ धरण पूर्ण भरले आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यातून पाणी ओसंडून वाहत असून मंगरूळ ते तापी नदीच्या पात्रापर्यंत हे पाणी पोहचले आहे.
पाण्याच्या प्रवाहामुळे नदीमधील मातीचा खरवा आणि वाळूचा स्तर पालटून वाळू वर आली आहे. जमिनीत पाणी मुरण्याला मदत करणारी वाळू मात्र चोरट्यांकडून लूटून नेली जात आहे. परिणामी नदीतील पाणी जमिनीत न मुरता सरळ तापी नदीमध्ये वाहून जात आहे.
महसूल प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वाळू चोरट्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी संतप्त शेतकºयांकडून होत आहे. याबाबत तक्रारीचे निवेदन प्रांत आणि तहसीलदारांना दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
भूगर्भातील जलपातळी वाढीच्या उपक्रमाला वाळू तस्करांचे नख
राज्य शासनाच्या ‘जलयुक्त शिवार’ अभियानाचा वसा घेऊन या परिसरातील शेतकºयांनी नदी पात्रात जागोजागी उन्हाळ्याच्या दिवसात पदरमोड करून मोठ मोठे चर खोदले होते. जेणेकरून पावसाळ्यातील पाणी जास्तीत जास्त जमीनीत झिरपून भूजल पातळी वाढावी आणि भविष्यात पिण्याच्या पाण्यासह बागायती पिकांना देखील पाण्याअभावी धोका उद्भवणार नाही यासाठी मोठ्या आशेने मेहनतीसह पैसे खर्च करून भविष्यासाठी केºहाळे येथील शेतकºयांनी नियोजनबद्ध हे काम केले होते. तथापि शेतकºयांच्या आशा- अपेक्षांवर वाळू तस्करांमुळे पाणी फेरले जात असून वाळू तस्करांवर कोणीच नियंत्रण आणत नसल्याने प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.