तरुणांनी ग्रामीण जीवनाचा सखोल अभ्यास करावा - साहित्यिक इंद्रजित भालेराव यांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:48 AM2018-10-21T11:48:50+5:302018-10-21T11:53:37+5:30
बहिणाबाईंच्या कविता प्रेरणादायी
सागर दुबे
जळगाव : ग्रामीण जीवनावर कविता करायची असेल तर तरूणांनी ग्रामीण भागात जाऊन तेथील जीवन समजून घ्यावे तसेच महात्मा फुले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर तसेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, शरद जोशी, कवयित्री बहिणाबा$ई चौधरी या साहित्यिकांचा सखोल अभ्यास करण्याचा सल्ला प्रसिध्द साहित्यिक प्रा़ इंद्रजित भालेराव यांनी दिला़
लेवा एज्युकेशन युनियनच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याखानमालेसाठी ते जळगावात आले असता ह्यलोकमतह्ण ने त्यांच्याशी संवाद साधला़
ग्रामीण जीवन अनुभवले़
इंद्रजित भालेराव म्हणाले, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील रिधोरा येथील मी रहिवासी. त्यामुळे माझे बालपण हे संपूर्ण ग्रामीण भागातच गेले. त्यामुळे ग्रामीण जीवन मी अनुभवले. सध्या परभणीत मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे़ लहानपणापासूनच कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितांची मला आवड होती़ त्यांच्या प्रेरणेतूनच मी कविता लिहायला सुरूवात केली़ कविता लिहीत असताना त्यात ग्रामीण भाषेचा वापर करत असतो, आणि तोच शब्द प्रत्येकाच्या मनाला भावून जातो़ बहिणाबार्इंच्या प्रत्येक कविता ह्या प्रेरणादायी आहेत.
शेतकऱ्यांच्या जगण्याला बळ मिळण्यासाठी कविता
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवा यासाठी नेहमीच मी लिहीत, वाचत आणि बोलत आलो आहे़ तसेच ग्रामीण भागात वाढत्या शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी व त्यांच्या जगण्याला बळ मिळावे यासाठी पुस्तक, कविता लिहील्या़ सोबतच गावोगावी व्याख्याने सुध्दा दिली. आतापर्यंत ५०० कविता लिहिल्या असून ११ कविता संग्रह असल्याचे प्रा़ इंद्रजित भालेराव यांनी सांगितले़ शेतकºयांसमोर झालेल्या कार्यक्रमानंतर ते भावना व्यक्त करतात़ तसेच तरूण सुध्दा आम्हाला आत्मविश्वास पुन्हा मिळाल्याचे अनुभव सांगतात़