दीपज्योती नमोऽऽस्तुते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 09:52 PM2019-10-27T21:52:29+5:302019-10-27T21:53:20+5:30
वसुबारस अर्थात सवत्स धेनू व्दादशीच्या शुभमुहुर्तावर गोमाता पूजन करून आपल्या कृषीप्रधान संस्कृतीचे जतन केले जाते आणि त्याच दिवसापासून दिवाळीबसणाला प्रारंभ केला जातो.
वसुबारस अर्थात सवत्स धेनू व्दादशीच्या शुभमुहुर्तावर गोमाता पूजन करून आपल्या कृषीप्रधान संस्कृतीचे जतन केले जाते आणि त्याच दिवसापासून दिवाळीबसणाला प्रारंभ केला जातो. गोपूजन, गो-संवर्धन, गोमूत्र, गोमय, पंचगव्य, गाईचे दूध, गोधन, गोग्रास व गोरक्षण या सर्वागिण विषयावर चिंतन करून पूज्य व उपयुक्त असणाऱ्या गोमातेचं पूजन करून गोधनाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस.
नभांगणात आकाश कंदील लावून, पणत्या उजळवून, इलेक्ट्रिक दिव्यांच्या रोषणाईने आसमंत कसं प्रकाशमान भासतं. त्यातला भावार्थ म्हणजे प्रत्येकाने आपल्या मनात, विचारात व आचारातदेखील ज्ञानाचा, सद्बुध्दीचा, सदाचाराचा दीप उजळून अज्ञानाचा, अंधकार दूर सारावा. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात म्हटल्याप्रमाणे,
दुरितांचे तिमिर जावो,विश्व स्वधर्म सूर्य पाहो!
दिवाळी अर्थात प्रकाशोत्सव! दीप म्हणजे श्रीलक्ष्मीचे प्रतिक. सायंकाळी दीवा लावण्याच्या वेळेत लक्ष्मी येण्याची वेळ मानली जाते. याच कालावधीत सर्व मंदिरांमध्ये पहाटे काकड आरतीचा नित्यनेम असतो. नवीन कापडांचा केलेला मोठा काकडा नंतर नाजूकशा फुलवातीव्दारे केली जाणारी मंगल आरती, पहाट प्रसन्न व उत्साहीत करून जाते. त्यावेळी भगवंतांचे स्मरण असे केले जाते. ‘आनंदांची दीपावळी, घरी बोलवा वनमाळी, दारी घालीते रांगोळी, गोविंद गोविंद.’ त्याचप्रमाणे अध्यात्म सांगितले जाते.
सुंदर माझ्या देहात, आत्मा हा नांदतो, चंद्र सूर्य दारात; गोविंद गोविंद.
चंद्र, सूर्य संदर्भ म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे व सूर्य हा बुध्दीचा कारक आहे. श्रीमद् भागवत सुत्रानुसार,
मन एवं मनुष्याणाम कारणम् बंधमोक्षयो।
त्याचप्रमाणे दीप म्हणजे आरोग्याचेही प्रतिक. आयुर्वेद जनक धन्वंतरी देवता जयंती धनत्रयोदशीच! विश्व आरोग्य दिन पाळाला जातो.
नरकासुरासारख्या अत्याचारी दृष्ट प्रवृत्तीच्या राजाचा, राक्षसाचा नाश करून भगवान श्रीकृष्णांनी बंदिवासातून मातांची मुक्तता केली, ती नरक चर्तुदशीलाच.
श्री महालक्ष्मी व श्री महासरस्वती पूजनाचा आशय असा की, ज्ञानाने, शिक्षणाने परिपूर्ण होऊन संपत्ती प्राप्त करावी. परंतु त्यासाठी अपार कष्ट, त्याग याची तयारी ठेवावी लागेल. त्यासाठी स्वामी विवेकानंदांचे सुप्रसिध्द सुत्र महत्वाचे आहे.‘स्वयं दीप बनो’
संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी देखील अभंगात म्हटले आहे,नाचू किर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी.’
विषमता, दरिद्रता, कलह, अराजकतेचा अंधार नाहीसा होवून, मनामनात समानतेची ज्योत लावण्याचा व प्रज्वलित करण्याचा हा दिवाळी सण सर्वांना सुख, समृध्दी व भरभराटीचा जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
- मुकुंद महाराज धर्माधिकारी, जळगाव