तमाशासाठी जमविलेल्या लोकवर्गणीतून पाझर तलावांचे खोलीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 04:29 PM2019-05-31T16:29:19+5:302019-05-31T16:34:09+5:30
चाळीसगाव तालुक्यातील दहिवद येथील गावालगत असलेल्या तिन्ही पाझर तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने भर पावसाळ्यात दरवर्षी भरणाऱ्या पाझर तलावात क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा साचत होते. तलाव उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे. ग्रामस्थांनी पाझर तलाव खोलीकरणाला लोकसहभागाचे बळ दिले असून, नुकताच खोलीकरणाचा शुभारंभ झाला.
जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जि.जळगाव . चाळीसगाव तालुक्यातील दहिवद येथील गावालगत असलेल्या तिन्ही पाझर तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने भर पावसाळ्यात दरवर्षी भरणाऱ्या पाझर तलावात क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा साचत होते. तलाव उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे. ग्रामस्थांनी पाझर तलाव खोलीकरणाला लोकसहभागाचे बळ दिले असून, नुकताच खोलीकरणाचा शुभारंभ झाला. तमाशासाठी जमा केलेली एक लाख चाळीस हजार रुपयांची लोकवर्गणी या विधायक कामाला देऊन ग्रामस्थांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. युवा उद्योजक मंगेश चव्हाण हेही मदतीला धावून गेले. त्यांनी खोलीकरणासाठी पोकलेन मशीन स्वखचार्ने उपलब्ध करुन दिले आहे.
दहिवद गावाची लोकसंख्या आठ हजार आहे. सधन शेतकरी गावकऱ्यांचे गाव म्हणून चाळीसगाव तालुक्यात दहिवद गावाचा वेगळा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आयाम आहे. गावाला लागून तीन मोठे तलाव आहेत. पाझर तलाव दरवर्षी पावसाळयात भरतात. मात्र यामध्ये तलाव निर्मितीपासून गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे पाणी साठवण्यासाठी खोली शिल्लक राहिलेली नाही. ही बाब सरपंच सुरेखा पवार, माजी सरपंच भीमराव पवार, उपसरपंच भीमराव खलाणे व सहकाºयांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत गावकºयांशी चर्चा करून या तिन्ही तलावांच्या खोलीकरणासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. यासाठी सर्वांच्या लोकसहभागाची गरज आहे, असा प्रस्ताव मांडला. याप्रसंगी तालुक्यात ज्या ठिकाणी पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशा ठिकाणी उद्योजक मंगेश चव्हाण हे आर्थिक मदत करत असल्याची बाब समोर आली. गावकºयांनी मंगेश चव्हाण यांची भेट घेऊन मदत करण्याची विनंती केली. त्यांनीही प्रतिसाद दिला. यासाठी पोकलेन मशीन उपलब्ध करुन दिले
दरवर्षी ग्रामीण भागामध्ये यात्रांप्रसंगी तमाशाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही परंपरा आहे. यासाठी गावात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वर्गणी जमा केली जाते. अशाच प्रकारे दहिवद गावात देखील एक लाख ४० हजार रुपये वर्गणी जमा झाली होती. याच वर्गणीतून पोकलेनसाठी लागणारा डिझेलचा खर्च करावा, अशी सूचना भीमराव पवार यांनी मांडली. त्यांच्या सूचनेचे गावकºयांनी स्वागत केले. काहींनी मदतही जाहीर केली.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर वाघ, भीमराव पवार, बळवंत वाघ चिंधा वाघ, एकनाथ पवार, एकनाथ खालाणे, नितीन बागुल, तानाजी जाधव, अनमोल नानकर, उत्तम कोळी, मुरलीधर वाघ, रतन पाटील, गोरख पवार, अनिल सोनवणे, हेमराज पाटील, पिंगळे सुदाम घोडे, बाबाजी मोरे, शिवाजी शितोळे, राजेंद्र पवार आदींसह ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.