जळगाव जि.प.सी.ई.ओ.यांच्या खुर्चीला सदस्यांकडून हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 05:17 PM2017-12-07T17:17:31+5:302017-12-07T17:26:35+5:30
जलव्यवस्थापन समितीच्या सलग तीन बैठकांना गैरहजर राहिल्याने व्यक्त केली नाराजी
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.७ - जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेला सलग तीन बैठकांना गैरहजर असलेल्या जिल्हा परिषदेचे सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांच्या खुर्चीला जि.प.सदस्यांनी हार घालत नाराजी व्यक्त केली. यावेळी आयोजित बैठक तहकूब करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची सभा गुरुवार ७ रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित केली होती. गेल्या दोन सभांना जि.प.सीईओ कौस्तुभ दिवेगावकर हे उपस्थित नव्हते. गुरुवारी जिल्हा रुग्णालयात सुरु असलेल्या विविध पदांच्या भरतीप्रक्रियेत सहभागी झाले होते. सीईओ उपस्थित नसल्याने जि.प.सदस्य पवन सोनवणे व रोहन पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. सलग तिन बैठकांना सीईओ हजर नसल्याने सदस्यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर ही बैठक तहकूब करण्यात आली.
दरम्यान, याबाबत सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत संकेत आहेत मात्र सक्ती नाही. समितीचे सचिवपद अतिरिक्त सीईओ यांच्याकडे असते आणि ते बैठकीला उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले.