सैन्यात भरती झालेल्या युवकांना धरणगावात मिरवणुुकीने निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:58 PM2019-03-18T22:58:08+5:302019-03-18T23:06:05+5:30
लष्करात भरती झालेल्या युवकांना मिरवणुकीद्वारे निरोप देण्यात आला.
धरणगाव, जि.जळगाव : नुकत्याच झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे युवकांमध्ये देशभक्ती संचारली असून, ‘जियो तो देश के लिये, और मरो तो देश के लिये’ असा नारा ग्रामीण भागातील युवक देताना दिसत आहे. याचाच प्रत्यय येथे आला. लष्करात भरती झालेल्या युवकांना मिरवणुकीद्वारे निरोप देण्यात आला.
नुकत्याच औरंगाबाद येथे झालेल्या सैन्य भरतीत जी.डी.पदावर येथील एकुलता एक असलेला पारस रवींद्र महाजन (मोठा माळी वाडा, धरणगाव), विशाल संजय पाटील (भोणे), राकेश मराठेसह तालुक्यातील सात युवक भरती झाले. त्यांना प्रशिक्षणासाठी कर्नाटक (बेळगाव) येथे मराठा बटालीयनमध्ये हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या युवकांच्या मित्र परिवारासह गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी मिरवणुकीने त्यांची विदाई केली.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, शिवसेनेचे गटनेते पप्पू भावे सामाजिक कार्यकते गुलाब मराठे माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील, सामाजिक कार्यकर्ते शरदकुमार बन्सी आदींनी सत्कार करुन लष्करात भरती झालेल्या या युवकांना शुभेच्छा दिल्या.
देशसेवेसाठी एकुलत्या एक मुलाला लष्करात भरती करून पाठविल्याबद्दल पारसचे वडील तथा पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र महाजन यांचाही सत्कार यावेळी माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील, गुलाब मराठे यांनी केला. यावेळी उपस्थित युवकांनी बसस्थानकावर ‘भारत माता की जय’चा जयघोष केला.