नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदार संख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 03:57 PM2018-01-04T15:57:24+5:302018-01-04T15:59:10+5:30
केवळ १० हजार ६५२ मतदारांची नोंदणी
जळगाव: शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी नव्याने मतदार यादी तयार करण्यात येत असून मागील निवडणुकीच्या वेळी असलेल्या मतदार संख्येच्या तुलनेत यंदा कमी मतदार नोंदणी झाली आहे. तर विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादी दुरूस्तीचे काम सुरू असून यंदा मतदार यादीत सुमारे ४० हजार मतदारांची भर पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिक्षक मतदार संघाच्या (विधानपरिषद) उमेदवारांची मुदत ७ जुलै २०१८ रोजी संपत आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस अथवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळे या निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली होती. त्याची मुदत संपली आहे. मागील निवडणुकीच्या वेळी मतदार संख्या १२ हजार ५०० च्या आसपास होती. मात्र यंदा या शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी केवळ १० हजार ६५२ इतकीच नोंदणी झाली आहे.
१० जानेवारीला मतदार यादी प्रसिद्धी
मनपा, विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादी दुरूस्तीची मोहीम राबविण्यात आली. ३ आॅक्टोबर २०१७ रोजी प्रसिद्ध यादीची मतदार संख्यात जिल्ह्यात ३२ लाख ६५ हजार इतकी होती. या दुरुस्ती मोहीमेत नव्याने ७० हजार ५४२ मतदारांचे आॅनलाईन नोंदणी अर्ज आले आहेत. त्यांची छाननी करण्याचे काम सध्या सुरू आहे. ते पूर्ण होईपर्यंत यापैकी २५-३० हजार अर्ज वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदार संख्येत नव्याने सुमारे ४० ते ५० हजार मतदारांची भर पडणार आहे. जानेवारी २०१७ मध्ये ३२ लाख २० हजार मतदार संख्या होती. ती सप्टेंबरपर्यंत ४५ हजारांनी वाढली होती. आता सुधारीत मतदार यादी १० जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे.