उद्दीष्ट निश्चित करुन पूर्णत्त्वाची जिद्द बाळगा-प्रांजल पाटील
By admin | Published: June 8, 2017 11:06 AM2017-06-08T11:06:55+5:302017-06-08T11:06:55+5:30
‘लोकमत’ला सदिच्छा भेटीदरम्यान तरुणांना दिला यशाचा मंत्र
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.8 - आत्मविश्वास ठेवून स्वत: निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर यश हमखास मिळते. यासाठी जीवनात कोणते तरी एक उद्दीष्ट ठरवा व ते पूर्ण करण्याची जिद्द बाळगा असा यशाचा मंत्र केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण प्रज्ञाचक्षू प्रांजल पाटील हिने दिला.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 124 व्या आलेल्या प्रांजल पाटील हिने बुधवारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या वेळी प्रांजलचे पती कोमलसिंग पाटील, वडील एल.बी. पाटील तसेच ‘दीपस्तंभ’चे जयदीप पाटील उपस्थित होते. या वेळी प्रांजलशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला हा संवाद...
प्रश्न- प्राथमिक शिक्षण ते स्पर्धा परीक्षा हा प्रवास कसा शक्य झाला?
प्रांजल पाटील- मी जन्मत: अंध नाही. काही कारणांमुळे माझी दृष्टी गेली. त्यामुळे दादर येथे अंधशाळेत ब्रेल लिपीमध्ये शिक्षण घेतले. ही ब्रेल लिपी दहावीर्पयतच उपलब्ध होती. त्यानंतर इयत्ता अकरावीपासून ब्रेल लिपी नव्हती. त्यामुळे मी घरी ब्रेल लिहू लागले. यासाठी मला आईची खूप मदत झाली. पदवीचे शिक्षण तर संगणकाच्या साहाय्याने घेतले. स्पर्धा परीक्षेचीही अशीच जिद्दीने तयारी केली व त्यात यश मिळाले.
प्रश्न- भविष्यातील काय कल्पना आहे?
प्रांजल पाटील - तशा माङया तर भरपूर कल्पना आहे. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला स्वत:ला खूप विकसित करायचे आहे. आज समाजात मोठय़ा प्रमाणात विषमता आहे. कोठेही नोकरी करायची झाल्यास रँकनुसार नोकरी मिळतच नाही. आर्थिक, सामाजिक विषमता दूर करण्यासाठीही मला काम करायचे आहे. समानता आणण्यासाठी शिक्षण हा मोठा घटक आहे. त्यामुळे शाळांमध्येही मी बोलणार आहे.
प्रश्न - अभ्यासाचे नियोजन कसे असायचे?
प्रांजल पाटील - अभ्यास करण्याची प्रत्येकाची शैली वेगवेगळी असते. अभ्यासाचे माङो गणित तासात कधीच नसायचे. मी सकाळी लवकर उठून अभ्यासाला सुरुवात करायची व त्यात सलगता ठेवत असे. दिवसभरात जे वाचायचे आहे, त्याचे नियोजन करायचे. रविवारी चाचणी परीक्षा असायची त्यामुळे त्या पद्धतीने अभ्यास करीत असे.
प्रश्न- गेल्या वर्षाचा व आताचा परीक्षेचा अनुभव कसा राहिला?
प्रांजल पाटील - मला माझी रँक वाढवायची होती. प्रशासकीय सेवा करायची असल्याने त्या दृष्टीने मी तयारी केली. यंदा तर माझा आत्मविश्वास आणखी वाढलेला होता. अनुभवामुळे चुका कमी झाल्या.
प्रश्न- आजच्या तरुण पिढीला काय मंत्र द्याल?
प्रांजल पाटील - प्रत्येक व्यक्ती ‘युनिक’आहे. आपण स्वत: विश्वासाने कशालाही सामोरे जा. स्वत:साठी उद्दीष्ट ठरवा. केवळ सामाजिक प्रतिष्ठा म्हणून पद मिळवू नये तर त्यासाठी मनाचीही तयारी असावी.
स्पर्धा परीक्षेतील यशाचे गमक काय ?
स्पर्धा परीक्षेत यशासाठी एकच गोष्ट कारणीभूत ठरली नाही तर दोन ते तीन मुद्दे यासाठी महत्त्वाचे ठरले. अभ्यास करताना ब:याचवेळा नकारात्मक दृष्टिकोन होऊ शकतो, तो टाळला पाहिजे. चांगली सोबत असणे गरजेचे आहे. मला आईची सदैव साथ मिळाली व तिने मला नकारात्मक गोष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मित्र-मैत्रिणींनीही मला चांगली साथ दिली. यामुळे यश मिळवायचे असेल तर सकारात्मक दृष्टिकोन, धैर्य आणि स्वत:ला अभ्यासात गुंतवून ठेवणे गरजेचे आहे आणि मी तेच केले, तेच माङया यशाचे गमक आहे.